जाता जाता....!

".....निघू आता?"
कितींदा सांगते, येतो म्हणावं...

"अगं हो... येऊ?"
हम्म...
चल मी येते, फाटकापर्यंत सोबत..
".....तुला करमेल कसं?, ए आणि असा उदास निरोप देणार आहेस? खूप प्रवास करायचाय इथून पुढे मला, हसरे डोळे बघून जाऊ देत.."

हो.. माहितीये! पुढची भेट?
"येतोच, फार- फार तर सात-आठ महिने... बास!"
बास???

थांब जरा... आई मी आलेच गं ह्याला जरा सोडून...
"बरं, अंधार पडण्याआधी ये, त्याला सांग पुढल्या वर्षी वेळेत यायला..."- आई
हो गं, आलेच- मी

"अगं तू कुठे येते आहेस सोबत? तुझ्या घराचं फाटक पडलं मागे...."
येते ना ... वेशीपर्यंत... तेवढीच सोबत मला तुझी...
बघ हे! तू जाण्याची नुसती कुणकुण लागली नाही की, गरमीने ताबा मिळवला इथे... रखरखीतपणा वाढलाच...
हे असं असतं,तू नसलास की फावतं सार्‍यांचं.... तुला मात्र 'जग' सांभाळायचं ना, सगळीकडे 'तू' हवहवासा... गरजेचा!... तू का कायम राहशील, इथे? माझ्यासाठी, माझ्यासोबत?

"रुसू नकोस गं... येतोच मी झटपट...."

हम्म... तक्रार तरी काय करावी?... तुला सगळ्यांनाच पहावं लागतं - कळतं रे मला सगळं...!!
ए, पण ह्यावर्षीही तुफ्फान बरसलास... मस्त! अगदी मनसोक्त!
मलाही शिकव ना... असं कधी.. रितं व्हायला...

अरे आणि हो, तुला सांगायचंच राहिलं, ऐक ना.. त्यादिवशी काय झालं, ना ____________ _________की______हिरवा________ इंद्रधनू_____ मस्त गरम भजी__________ गप्पा___________पालवी_______ तू बरसलास______ गडगडाट____________ काळे ढग____हसू नकोस ना_________मग्_______तू_____आलास जोरदार_____ चिंब____हसू__

आणि मग एक ना दोन...
त्याच्या -माझ्या गप्पा रंगल्या...
वेशीवरच!

जुने मित्र-मैत्रिणी भेटलो, की घरात बसून जितक्या गप्पा होत नाहीत, तितक्या निरोप देता- घेताना दारातच होतात, तसच हे....

काय बघतो आहेस?
"तुला!! कित्ती भरभरून बोलतेस ते.... "

हम्म.. तू ये आता, उशीर होतोय, अरे हे काय, काळोख दाटून आलाय....?? चल बाबा, मी पण येते, वाट पहात असतील घरी... आता ही गरमी, रखरख अशीच राहिल... उकडतंय पहा आत्तापासूनच! लोकांचे त्रासिक चेहरेच बोलतात, काय खरं ते....जाऊ दे, सुरू झाली माझी बडबड पुन्हा!

वाट पाहीन तुझी, पाहते आहे- आत्तापासूनच.... वेळेत ये बघ तू, मृगालाच ये अगदी! आणि... काळजी घे!

"हिरमुसून निरोप देते आहेस?... अगं नी हे काय?? माझा एक ढग आतच विसरलाय.... तू निघ पाहू घरी, मी तो ढग घेतो आणि लागतो प्रवासाला.... हा नाठाळ माझा डोळा चुकवून कुठे दडलाय ते पाहू देत..... येतो गं"

आणि उडालासही.... वेशीवरून पुन्हा आत...

मीही तुझ्याच विचारात, घराकडे माझ्या... तुझं 'निव्वळ असणं' सुद्धा किती प्रसन्न रे... आत्ताच उदास वाटू लागलंय... तू तुझा मागे राहिलेला ढग उचलून निघून जाशील... दिसशील का, जाता-जाता? मान उंचावून पहात राहिले..... रग लागली पण अंधारात तुझं आता काय दर्शन...?

रिमझिम.....

रिमझिम....

रिमझिम....

१- २- ३--------, ८--१०-१२. तुझेच ठिपके...
अरे... काय हे?

टिपटिप.... टिपटिप...

मृद्गंध!! अहाहा.... श्वास भरून...

धारा....सरी..

भिजतीये..... हलके हलके!
गार हवा...
रखरख क्षणार्धात लुप्त?..

गावात पोहोचले मीही...

पोरं -सोरं.... बाहेर.... हसत- खिदळत!! "अरे पाऊश आला पलत" असा गलका करत!!
त्रासलेल्या चेहर्‍यांवर गारव्याचं हसू उमललं...

माझ्याही!

पुढ्यात तू अचानक्क!
.... हसले फक्त! हसर्‍या डोळ्यात खोल पहात उडालास पुन्हा...

एक वीज... एक नजरा-नजर!

एक हसरा निरोप!!

कसा रे जाता- जाता सगळयांना प्रसन्न हसू देऊन जायला जमलं... तुझ्यासारखा तूच!!
छे!!
ढग विसरल्याचा बहाणा होता तर....

-बागेश्री
१३/१०/११

Post a Comment

1 Comments

  1. जाणार्‍या पावसाशी केलेला संवाद आवडला.

    ब्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete