स्वप्नांचा बाजार...

"स्वप्नांचा बाजार"
नाव वाचताच रहावलं नाहीच, आत डोकावून पाहण्याचा मोह आवरला नाहीच गेला.
एका छान निळसर गेटला ताज्या- टवटवीत फुलांच्या माळांनी सुशोभित केले होते. त्या गेट वर ही पाटी होती... आत बरीचशी माणसं दिसत होती..घड्याळ्याकडे लक्ष गेलं रात्रीचे ११ वाजत आले होते, त्या बाजाराच्या प्रवेशद्वारावरच यात येण्याच आवाहन होतं...

धुंद व्हावं, हवेवर अगदी तरंगावं असा मोहक गंध पसरलेला होती आत सर्वत्र.. अगदी प्रचंड रोषणाई चहुकडे ... सगळीकडे रंगबिरंगी स्वप्ने विकायला ठेवली होती,
माझी पर्स तिथे बाहेरच काऊंटरवर काढून घेतलेली, मला एखादं स्वप्न आवडलंच, तर मी मोल तरी कसे देऊ?
बरं म्हणावं, तर ह्या बाजारहाटीचे नेमके नियम तरी काय- ते उल्लेखणारी एकही पाटी त्या सबंध बाजारत नजरेस पडत नव्हती- जाऊ दे, इथले प्रसन्न वातावरण मनाला भुरळ पाडते आहे, पाडत जाते आहे... एव्हढंच उमगत होतं.

सुंदर दुकानं- प्रत्येकाला फुलांची सजावट, कुठे निशिगंध तर कुठे गुलाब, कुठे अबोली तर कुठे सोनचाफा, एक- एक दुकान सुंदर- नीटसं, प्रत्येक दुकानाच्या माणसाला शुभ्र कपडे, गांधी टोपीचा गणवेष जणू.. वर मोकळं आकाश- टिपूर चांदण्यांनी व्यापलेलं...सगळं काही स्वच्छ, नितळ, चमचम करणारं!
कितीतरी वेळ मी एकाच जागी उभी राहून हे सारं पाहत राहिले... एक रस्ता, त्याच्या एका मु़खाला प्रवेशद्वार, दुसरीकडे बाहेर पडण्याचा मार्ग, रस्त्याच्या दुतर्फा ही सुंदर दुकानं...
मी पुढे सरसावले, बघावं एखाद्या दुकानात डोकावून, स्वप्नविक्रेत्यांशी संवाद साधायचाय...
"नमस्कार, स्वप्न विकतात का इथे?"
त्याने फक्त नजरेने होकार दिला, तसं मी वळून परत सगळ्या दुकानांकडे पाहिलं तर हे दुकानदार बोलतच नव्हते, सारा खाणाखुणांचाच कारभार, माझ्या अवती भोवती फिरणार्‍या माणसांकडेही पाहिलं, ह्यापैकी बर्‍याच जणांना नाक-कान-डोळेच नव्हते- सपाट चेहरे! .. सगळी शरीरं स्वप्न खरेदी- विक्री करण्यात मग्न पण त्यांना डोळे नाहीत, बोलायला ओठ नाहीत, जीव्हा नाही... ज्यांना नाकी- डोळी आहेत ते एकमेकांशी बोलत नव्हते...कुठे आलेय मी? का? मी दचकून माझाच चेहरा तपासला, माझे नाक- डोळे आहेत तसेच होते. हो, मला दिसत होतं भोवतालचं म्हणजे मला डोळे आहेतच- हा सारासार विचार होता, पण तो मला वेगळा करावा लागला?
मला इथून बाहेर पडावंही वाटत नाही ... पण इथे रहावत सुद्धा नाही! आता मला विचार करायला जड जात होतं..
विचार बंद झालेत वाटत होतं...
ह्या अजब जागेची मोहिनी पडत होती..

कुठूनसा आवाज आला- ती घोषणा असावी, मघापासून आवाजही नव्हता इथे, कसलाच- माझाच एक प्रश्न वातावरणात उमटून विरला होता...

"लक्ष द्या. आजचा बाजार बंद होण्यासाठी शेवटची दहा मिनीटे उरली आहेत. नियमाप्रमाणे इथे स्वप्ने देऊन स्वप्नेच घ्यावी लागतात, स्वप्नाचे मोल स्वप्न! इथे 'पूर्ण होऊ शकणारीच' स्वप्ने विकत मिळतात, त्या मोबदल्यात तुम्हांला तुमच्या मनाशी जपलेले एक अपूर्ण स्वप्न द्यावे लागते. पुढील पाच मिनिटात हा व्यवहार पूर्ण करावा, एखादे स्वप्न दिल्या- घेतल्याशिवाय- बाहेर जाण्याचा मार्ग खुला होत नाही.
खरेदी जरी न केल्यास, एक अपूर्ण स्वप्न मात्र शेवटाच्या काऊंटरवर जमा करावे- ह्या बाजारात फिरल्याची फी म्हणून, म्हणजे बाहेर पडता येईल. शिवाय इथे दिलेले अपूर्ण स्वप्न तुम्हांला उरलेल्या जीवनमानात कधीही आठवणार नाही.
व्यवहार पूर्ण न झालेल्यांची पूर्ण- अपूर्ण सारी स्वप्ने काढून घेण्यात येतात, शरीर असूनही 'स्वप्न नसणारे- ध्येयपूर्ती करण्याचा महत्त्वाचा दुवाच नसणारे' अशी तुमची अवस्था म्हणजे महत्वाचे इंद्रियच नसल्यासारखी होते- व तुम्हांला ह्याच बाजारात भरकटत राहण्याची मोहिनी व्यापून राहते. ह्याला ह्या बाजाराचे प्रशासन जबाबदार नाही, हा बाजाराचा नियम आहे आणि तो आयत्यावेळीच सांगण्यात येतो, शेवटची नऊ मिनीटे आपल्या पदरात, व्यवहार पूर्ण करून बाहेर पडण्यासाठी"

प्रयत्नपूर्वक मी स्वतला गोळा केलं, माझ्या विचारशक्तीवर ताबा मिळवण्याची धडपड सुरू केली.

मी घड्याळ पाहिले, मला एकही आकडा दिसत नव्हता, मला ओलांडत धावणार्‍या मिनिटांना मी मोजू शकत नव्हते, मी धावले एका दुकानदाराकडे, मला स्वप्न विकत घेऊन माझे अपूर्ण स्वप्न द्यायचे होते, हा व्यवहार मला रूचला नव्हता, मी जपलेले प्रत्येक अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तर मी जगत होते! मला माझी स्वप्ने स्वतः ठरवायची आहेत, त्यांच्या अपूर्णेतही सुख शोधायचं आहे, मी उराशी जपलेली अपूर्ण स्वप्नेच माझी जगण्याची ताकद आहे, पण आता काय उपयोग? मला बाहेर पडायलाच हवय!! मी धास्तावले होते, त्या दुकानदाराला मी बोललेलं कळत नव्हतं, मलाही त्याचे ते हातवारे उमजत नव्हते, कळत इतकच होत के वेळ जातोय, किती- ह्याची मोजदाद नव्हती!

अशी 'पूर्ण होऊ शकणारी स्वप्ने' हवीत का मला?, त्रिवार नाही -माझाच निर्धार पक्का झाला, इथून बाहेर पडण्यासाठी आता एकच मार्ग, माझं एखादं अपूर्ण स्वप्न त्यागायचं, कायमसाठी...
त्या काऊंटरवर नाकी- डोळी शाबूत असलेल्यांची गर्दी होती- ओळीतली माणसं फटाफट सरकत जात होती, पण ते माझ्याशी किंवा मी त्यांच्याशी संवाद साधू शकत नव्हते- हा त्या मोहिनीचा परिणाम!

मला नेमकं कोणतं स्वप्न त्यागावं हा कसोटीचा निर्णय घेणं जड जात होतं, माझ्या हातांची चाळवा- चाळव थांबत नव्हती, फुटलेल्या घामाला पुसण्याच भान नव्हतं.. माझा निर्णय मलाच घ्यायचा होता, कारण- कारण मला बाहेर पडायचं होतं...

मला आता खच्चून ओरडायच होतं पण माझा आवाज फुटत नव्हता, पटकन स्वप्न त्यागलं नाही तर
माझं एकेक इंद्रिय गारद होईल ह्या विचाराने अंगभर भितीची लहर फिरली. माझा नंबर आला, माझ्या मागे कोण आहे, कुणी बाहेर पडतंय का, हे सारं पहायला न मला अवकाश होता, ना हिम्मत!
काऊंटरवरचा सपाट चेहरा माझ्या दिशेने वळाला- माझाही निर्णय झाला, त्याने एक स्वच्छ रुमाल अंथरला त्यावर मी माझं "आयुष्यात किमान एकाजवळ, माझं जगणं व खर्‍या 'मी' ला- आहे तसं उलगडून ठेवेन" हे स्वप्न अलवार ठेवलं आणि, आणि माझ्यासाठी ते बाहेर जाणारं द्वार उघडलं..! अत्यानंदाने मी तिकडे धावले..

बाहेर पडताना पाहिलं - माझ्या मागच्याचे नाक- डोळे- त्याच्याच चेहर्‍यात विरत चालले होते..
स्वतःच्या किमान एका स्वप्नावर पाणी सोडणं त्याला जमलंच नसावं.......
-बागेश्री
१४\०१\२०१२

Post a Comment

1 Comments

  1. भारीच !

    असं स्वप्नांवर पाणी सोडणं अवघडच. तसंच स्वत:ला उलगडणं त्याहून अवघड !

    ReplyDelete