तुझे मन...!

आज मी तुझं मन, खणायला घेतलंच शेवटी....
एक भली मोठी पिशवी घेऊन प्रवेश करणार होतो. नको ते सल, तण उपटून टाकून बाहेर घेऊन येण्याच्या हेतूने...
प्रवेशाचे महाद्वारच महामजबूत!!! आत प्रवेश करायलाच माझी निम्मी शक्ती खर्ची पडली, पण; आज मी ही माघार घेणारच नव्हतो...
तुझी मन-वस्ती सूनसान आणि निपचित वाटली मला, सगळं आवरत, स्वच्छ करत निघालो.. बरीच जळमटं, सर्वत्र धूळ, जिवंतपणाचं एकही लक्षण नाही त्यात.. अवकाशाने कळालं मी भूतकाळात शिरलोय तुझ्या मन- गाभ्याच्या!! कारण तू, आपल्या अनेकाविध झालेल्या चर्चा- गप्पांमधे, नकळत दिलेले संदर्भ तिथे धूळ खात पडलेले दिसले...
अनेक जूनाट झोपड्या, त्यावरची धूळमटलेली कौलारं, विझलेली कंदिलं, जीर्ण चबूतरे, निष्पर्ण झाडी आणि बरेच काही.. तू गेले कित्येक वर्षांत इकडे फिरकलीच नाहीस हे जाणवलं, थोडं बरंही वाटलं आणि निरातिशय आश्चर्य ही!
एखाद्याला आपला भूतकाळ असा पूर्णपणे दूर्लक्षित करता येतो? इतका की, त्यात खरेच काय होते हे आपले आपण ही डोकवून पहावे म्हटले तर धूळींच्या पापूद्र्यांखाली, काही म्हणता काहीच दिसू नये?
अगं, कबूल आहे, नकोसे क्षणच तू जास्त पाहिलेस, पण; म्हणून अनुभवलेल्या हसर्‍या क्षणांना सुद्धा तू गळफास द्यावास?
छे! वर्तमानाचा हसरा भूतकाळ करायला- हे क्षण सोबतीला हवेतच..!
इथे, तुझे सारे हसरे क्षणही मला मलूल, केविलवाणे दिसले ज्यांनी कधी तूला, तू जिवंत असल्याची कबूली दिली होती!!!
आज नकोश्या क्षणाबरोबर त्यांनाही तू कायमचं त्यागलेलं पाहून मीच दचकलोय!
माझ्या पोतडीत मी जमतील, मिळतील तितके दु:खी क्षण घेतो आहे भरून, ही अडगळ कायमचीच बाहेर न्यावी म्हणतोय... त्या जळमटलेल्या झोपड्यांनाही देतो आहे नवजीवन माझ्यापरीने, जमेल तसे!
विझलेल्या कंदीलांवर साचून राहिलेल्या काजळींसारखे, काळवंडलेले हसरे क्षण मात्र मी जिवंत केलेत, निव्वळ एक फुंकर मारून.....
ते उडत आहेत ह्याच स्वच्छ परिसरात आता, गोंडस फूलपाखरांप्रमाणे!!! निष्पर्ण झाडंही बहरतील, तुझ्या आटलेल्या आनंदाश्रूंना स्पर्शून जो आलोय...!
तसं हे काम सोपं होतं, पण महाद्वारावर असलेला तूझाच खडा पहारा तोडणं सोप्याला अवघड स्वरूप देऊन गेलं... 
बाहेर पडण्याआधी रंगीत, हसरा परिसर दिसला एक, पहावं म्हटलं, तर कळालं तो वर्तमान होता...
तो परिसर मात्र फार सुंदर ठेवला होतास तू, मी ही दिसलो मला आणि बाहेरून ऐकू आलं तुझं खळाळ हास्य, कदाचित आपल्याच गप्पांमधून फुललेलं असावं ते... काही क्षणातच ह्या हास्यांनाही भूतकाळाच्या वस्तीत जावे लागेल.. मी समाधानी होतो, कारण आता त्या वस्तीत हे हास्य चिरंतन राहणार होतं.. हा विश्वास मला आपल्या नात्यानेच दिला होता....
                                   समाधानी मनाने मी बाहेर पडलो, महाद्वार हलकेच टेकवून घेतलं, तो गोजिरं हास्य ओठांवर खेळवत, तू स्वागताला तयार दिसलीस.. तूझ्या डोळ्यांत चमकून गेलेली कृतज्ञता, मला मी केलेल्या कामाची पावती देऊन गेली... माझ्या छातीवर तू टेकवलेलं डोकं, किती वेळ थोपटत बसलो होतो ते आठवत नाही...  
 -बागेश्री
२२\०१\२०१२



Post a Comment

2 Comments

  1. Chan lihile aahes .. kharach manachi bhramanti karun aalyasarkhe watale ...

    ReplyDelete