Friday, 2 March 2012

आव्हानातले जगणे..

नवनवीन आव्हानांना
हलकेच झेलून,
पाठीवरच्या पोतडीत टाकत,
जीवापाड धावताना
दमछाक होतेच....

एखाद्या मनोरम वळणावर
मग, विसावतांना
निवांत क्षण येतात रांगत..
अलगद घेते कडेवर त्या क्षणांना..
गोंजारते, कुरवाळते

जडावलेली काळा- वेळेची शाल मात्र
जरा ठेवते उतरवून..!

घेते जगून- काळीजभर!

आव्हानांची वळवळ जाणवली,
की, उतरवावेत कडेवरचे क्षण आणि
घ्यावी शालही लपेटून,
रेंगाळलेल्या मनपाऊलांना द्यावी गती..

आता ह्या वळणानंतर मात्र
लपेटलेल्या शालीची ऊब
हवीहवीशी.....

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...