Saturday, 8 December 2012

खेळ मनाचे....!!

बाहेर संथ लयीत कोसळणारा तू...
तुझा निखळ नाद ऐकताना,
विचारांची तंद्री कधी लागली,
ते आजही कळलं नाही...

मनाचे खेळ झालेच सुरू!
ह्या टोकावरुन त्या टोकावर...!
टोकं लागली खुपायला...
मन पडलं बद्दकन!
लागलं पुन्हा!
नवीन जखम, की जुनीच सोलवटली?
काही का असेना...
पण, आता औषध कुठून आणू?
काळाची डबी रिकामीच होत चाल्लीये...

आजीची चुन्याची 'डबी'?
हो, कित्येकदा तेच लावायचो ना, औषध म्हणून...!!

आताशा दिसेनासेही
झालंय 'आजीला',
मोती पडलाय म्हणे डोळ्यांत...

तुझे 'डोळे',
कशी विसरेन? पाठलाग आहे तो,
विचारांनी पाठलाग सोडला म्हणजे पावलंच!

भरून 'पावलो' गं!
हेच म्हणायचास ना दरवेळी, हातात हात
प्रेमाने घट्ट धरला की?

नात्यांची 'घट्ट' वीणही सैलावते, अजाणता,
निव्वळ जगता-जगता!

'जगता-जगता',किती भुमिका वठवत आलेय आजवर...
गरजेनुसार वेग-वेगळी रुपं, धारण करतच आलेय..
गरजेनुसार की अक्षरशः ऋतूमानांनुसार
उन्हाळे पाहिले,
हिवाळे जपले
अन् पावसाळे?
ते तर आत-आत मुरवलेत...

आताही तू कोसळतो आहेस,
तंद्रीत मन खेळतंच आहे...

ह्या जाणीवेनंच, तंद्री विस्कटली बघ!!

चला, दैनंदिन कामांना लागलं पाहिजे, परतून...!!

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...