Thursday, 24 January 2013

आकाश...

आकाशाचं इतकं आकर्षण का वाटत असावं?

ते मोकळं
ते विशाल
ते सर्वव्यापी
म्हणून?
की,
ते कोसळलं तर धरणीची त्रेधा उडेल, इतकं ते सामर्थ्यवान आहे म्हणून...?

सार्‍या धरित्रीला प्रकाशमान करणारा तारा,
प्रेमीजनांना वेड लावणारा ग्रह त्याच्या पोटात सामावतो म्हणून?
दाटणारे मेघ त्याचेच,
सांजेचे रंग त्याचेच,
पहाटेची प्रभा त्याचीच,
रखरखणारी गर्भ दुपार त्याचीच...

खूप अस्वस्थ असताना त्याच्याकडे एक नजर टाकली,
की ती नजर त्याच्या विशालतेत सामावून जाते..
त्यांत गुंतून जमीनीपासून काही वेळ तरी पाय वेगळे व्हावेत वाटून जातं!

हे टिकून राहिलेल अप्रूप हवंहवंसं वाटत रहातं..
जरी त्यामगचं कारण नीटसं कळलं नाही, तरी....!

शेवटी वाटून जातंच...
निव्वळ त्याला पहाता येणं ह्याबाहेर ते कायम अप्राप्यच, म्हणून हे आकर्षण! 

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...