प्रतारणा....

हो, मी प्रतारणा करतेय.
तुझ्याशी, त्याच्याशी, तिच्याशी, आई- बाबांशी, समाजाशी - नाही.
तर 'आयुष्या', तुझ्याशी!

जन्म झाला, पहिलावहिला श्वास घेताना माझ्या हाताची कोवळी बोटे तुझ्या कणखर हातात गुंफली.... अपार विश्वासाने. शेवटाच्या श्वासालाच ही पकड सुटेल, गृहीत धरलं असावं..

मी तुझ्यापेक्षा लहान, सर्वार्थाने!  तू मोठा, सर्वार्थाने.
आणि म्हणूनच तू माझ्याही नकळत हात सोडवून घेऊन माझं बोट धरलंस.... ताबा घेतलास.

आता तू नेशील तशी निघाले..
माझ्या वाटा, माझ्या इच्छा, माझं जगणं, माझे बेत... नव्हतेच कुठे!
दिशा तुझी, बेत तुझे... सारं तुझं, मी तुझ्या बोटाशी लोंबकळत... कधी बेताची चाल, तर कधी तुझ्या वेगाशी समरसताना झालेली दमछाक....
ह्यात भरीला, 'परिस्थिती' नावाची सखी तुझी!
तुझं बोट सोडवण्याचा बंडखोरीचा विचारही करता, दुसर्‍या हाताचं बोट घट्ट धरायलाही सजग... आता पावलं पडली नाही तरी तुम्ही दोघे फरफटत नेणार... तुमच्याच दिशेने... तुमच्याच पद्धतीने.

का घडलं असं?
तुझ्यावर टाकलेल्या विश्वासाने?
तुला जाणीव असावी, "मी म्हणजे सर्वस्व, ही म्हणजे असहाय्य?
असे अनेक जण घेऊन मी धावतोय..
जो थांबला, तो संपला.
माझं बोट सुटलं, की एक जीवनसत्र संपुष्टात आलं..."

ही असहाय्यता, आम्हीच ओढवून घेतली आहे, आमच्यावर, तुला अकारण महत्त्व देऊन. जन्मापासून ते शेवटापर्यंत..

आता पुरे ना!
बदल घडवूयात.

तुझ्यावरचं हे अवलंबत्व मला झुगारायचंय.
तुझ्या विरूद्ध दिशेला वाटचाल करायची आहे.
जिथे मी बेत ठरवेन... माझ्या इच्छा असतील.. वाटा माझ्या असतील, वेगही माझा असेल.
पदोपदी धक्के नसतील... ठराविक मुक्काम असतील.
तुझीच नाही तर तुझ्या सखीची तमा बाळगण्याचा प्रश्नच नाही...

'सुटका होऊच शकणार नाही, ह्यांना स्वतःचं अस्तित्त्व नाही', ह्या समजूतीत सैल झालेले तुमचे हात झिडकारण्याची हीच वेळ!

हीच प्रतारणेची वेळ...

निघालेय...
आठवण आलीच, स्वतःची हार मंजूर करता आली, तर ये परतून...
माझं बोट तू धरल्यास, माझी हरकत नाही.

- बागेश्री 

Post a Comment

1 Comments

  1. ANAND PENDHARKAR29 March 2013 at 08:46

    Pudhe chal. Bhiu nakos mee tuzya paathishi aahe.

    ReplyDelete