बाप

तो घरात आला...
पडके खांदे, उदास चेहरा...
आता थोड्याच वेळापूर्वी कार्यकर्त्यांबरोबर केलेल्या आवेशपूर्ण मसलती,
उद्या तडकाफडकी काही अधिकार्‍यांना भेटण्यासाठी आखलेल्या मिटिंग्ज,
तिथे बोलण्यासाठी वेगळे काढलेले मुद्दे-
"आज दिल्लीसारखी- मुंबई! उद्या मुंबई सारखा प्रत्येक गाव- देशाच्या लेकी-बाळी असुरक्षित."
मुंबईतल्या ताज्या घटनेवर वृत्तपत्रात देण्यासाठी तयार केलेला मसूदा
हे सगळं मागे पडलं एकाएकी अन् भरून उरली एक पोकळी..
.....आपण झोडत असलेली सुरक्षिततेवरची भाषणे आणि प्रत्यक्षातली सुरक्षा व्यवस्था ह्यांतील तफावत, घर जवळ येताच प्रकर्षाने त्याला जाणवली...
पदोपदी हतबलता,
असहाय्यता....
खिन्नता..

घराचं लॅच उघडून आत आला, तरी "तिला" कळलंच नाही...
ती आपला भातुकलीचा खेळ मांडून स्वतःतच मश्गूल...
तो तिला पाठमोरी पाहून उभ्या जागी गलबलला...

तिला तसंच हलक्या हाताने त्यानं कडेवर घेतलं,
छातीशी घट्ट कुरवाळलं, तिच्या निरागस स्पर्शानं तर आणखीच हळवा झाला..
"बाबा, तू केवा आलाश? चॉक्की कुते?"
त्याने तिला आणखीच घट्ट धरलं, जणू त्याला तिला असंच जवळ ठेवायचं होतं, तरच त्याची लेक सुरक्षित राहिली असती,
"बाबा, तू का ललतोश?"

तिची बडबड ऐकताच, तिची बेबी सिटींग करणारी आया धावत आली...
तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला त्यानं...
"मै.... मै, बस अभी अभी अंदर गई थी साब, किचन में, बेबी के लिए बोर्नविटा दूध बनाने, मै उसे बिलकूल अकेला नही छोडती साब...."

त्यानंनं खिशातनं फाईव्ह स्टार काढलं..
तसं त्याचं वासरू आनंदलं, बापाला घट्ट बिलगलं...
"मी आनि माझी बाहूली चॉक्की खातो बाबा, तू ... तू ते दूदू पी"

तसा आयाने तिचा ताबा घेतला..

तो तिचा आनंद साठवत वळला..
बेडरूममधे गेला, बायकोच्या फोटोकडे पहात.. फोटोला घातलेला हार एकसारखा करत.. कितीतरी वेळ तसाच... !!
सगळं धूसर झालं तसं तिथून दूर झाला...

घाईनं खिशातला मोबाईल काढला...
"श्रीवास्तवाजी, आप चाहते है मै मेरे लिए सेक्यूरिटी
एक्सेप्ट करु... लेकीन क्या वह मेरे बझाय मेरी लडकी को दे पायेंगे, प्लीज!!"

-बागेश्री


Post a Comment

1 Comments

  1. आई ग्ग हे किती व्याकूळ आणि आर्त

    ReplyDelete