Wednesday, 5 March 2014

पाणी....

समुद्राकाठी रेतीचं घर करण्याचा अट्टहास!
त्या घराचं आयुष्य, माहीती नाही!
त्याच्या तिच्या नात्याचंही!

घर खोटं
नात्याचा अखंडपणा खोटा,
सागर खरा
त्याची गाज खरी..
पाणी खरं
त्याची लाट खरी...
त्याने किमया दाखवली
एक लाट, सारं भूईसपाट...
ढासळत्या घराला सावरायला
मग चार हातांची अशक्य लगबग

वर्ष सरलीत..
आता कधी कागदाला लेखणी टेकते तेव्हा
रेतीचे वाळलेले कण
कागदभर विखुरतात,
वेगवेगळे आकार साकारतात...
स्वप्न कागदावर उतरतात,
बघता बघता धूसर होतात..
डोळाभर धुकं साचतं, 
ओघळतं..

दरवेळी वास्तवाचं भान यायला
खारं पाणीच उपयोगी पडतं!

-बागेश्री
 

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...