मन हळवे होत नाही...


हळूच गेली,
दाराने मागल्या
चकवून मजला
पाऊले जवळची,
अशी निसटली, थांग ना लागे
उरले येथे काय काय हे..
पानावरले अक्षर निळसर
उडून गेल्या श्वासाचे अत्तर
कातर हळवे
क्षण प्रेमाचे
शिंपले, मोती,
तुकडे काचांचे,
किती कितीशा
वस्तू जपलेल्या
कशा कशाचा अर्थ ना लागे..!

किरणांची नक्षी
उमटून आहे
उदास रिकाम्या खोलीमध्ये..
जाते आवरत एक एक मग,
सापडते जे इथे तिथे ते
जाळी धरलेले पानच पिंपळ,
डबीत उरले सुरले काजळ
कधी काळच्या नजरा प्रेमळ
नित हास्याची खळखळ खळखळ

कितीक सामान येथे साठले
कोणी सोबत नेले नाही..
राहत होते कोणी येथे
ह्याची ग्वाही मागे राही..
मनात आता पूर्वीसारखी,
गजबज गजबज नाही,
मन हळवे होत नाही
मन कातर होत नाही

-बागेश्री
10/4/14

Post a Comment

0 Comments