सृजन

पहाटेच्या नाभीपासून,
रात्रीची नाळ तुटते तेव्हा,
जन्माला आलेला 'दिवस'
टकामका डोळ्यांनी सूर्यकिरण पसरत राहतो...
दुडदूडती पाऊलं क्षणामाजी वाढत जातात
मध्यान्हापर्यंत अवघ्या धरणीचा ताबा घेतात!
मातीवरची सूस्त दूपार सरत जाते,
उन्हें कूस बदलतात,
रिमझिमता पाऊस अलवार उतरत साथ करतो..
दिवसाचं मुसमूसलेलं तारुण्य प्रकट होऊन नाचू लागतं!
कलत्या सूर्याला क्षितीजापार निरोप देऊन परतताना,
घराघरांतून कानावर येणार्‍या "शुभं करोति"ने
म्हातार्‍या दिवसाच्या मिशा थरथरू लागतात!
नीजेला कवटाळत दमला भागला दिवस अंग टाकतो तेव्हा
धरणी सृजनतेने निथळत असते!
कणाकणाला वाढणारा रेशमी अंधार
तिच्या गर्भाला चंद्राची आभा देतो!
निसर्गाची काही वेळाची नि:स्तब्धता पार पडली, की
पहाट दवाबरोबर धरतीच्या वेणा सर्वदूर ऐकू जातील.....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments