बहूपदरी, बहूआयामी!

तुझ्या अंतर्मनाचे एक एक पदर सुटे होताना
त्या प्रत्येक पदराशी दिवसेंदिवस रंगाळत राहते..
कधी त्या पदराने,
दु:खाने माखलेला माझा चेहरा पुसून घेतोस
कधी त्या पदराची दोन टोकं, 
तुझ्या माझ्या आयुष्याला बांधून त्याची झोळी करून देतोस

मी झुलत राहते
तुझ्या आवर्तात....
श्वास संथ होतो
डोळेही विसावतात,
ह्या झोळीइतकी शांत झोप इतर कुठे लागावी?

मग येणारी जाग सुखाची
तुझ्या कवेतली,
तुझ्या उबेची

तू मात्र तुझे पदर आता मिटून घेऊस नकोस
असाच रहा
बहूपदरी
बहूआयामी....

मी आहेच...
पदरांचा पोत राखायला...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments