चकवा

ऐक ना,
कधीचंच म्हणतेय, तुला पत्र लिहू या. जमून आलंय आज.
तूही जरासा वेळ काढ.
सर्रकन पत्रावर नजर मार. मग मग्न हो तुझ्या वैश्विक उलाढालीत...

तू कधी काळी निर्मिलेला एक कण आहे मी.
चालता बोलता. भावनांना जाणणारा.
तुझ्यालेखी यःकश्चित.
मला फार मजा वाटायची नव-नवीन भावनांशी ओळख होताना, आधी कधीच न जाणवलेलं पहिल्यांदा जाणवून घेताना, वाटत गेलं, किती सुंदर आहे जगणं. रंगबेरंगी!!
भावनांचे गडद- फिके रंग पाहता भूल पडायची, हरखून जायचे.
रोज नवं काही कळत गेलं. आनंद मिळत गेला. दु:खाचेही प्रकार समजले.
दु:खामागोमाग सुख येतंच, जाणीव घट्ट मुरत गेली.
असंच काही काही शिकत मोठी झालेय.
पण आज काल काहीतरी खूपच स्पष्ट झालंय.
अंधारातून भपकन प्रकाशात यावं आणि सगळं दिसण्या आधी क्षणभर डोळे बंद व्हावेत
ते उघडण्याची कोण धडपड होते माहितेय?
पण आता वाटतंय... ते घट्ट घट्ट मिटूनच घेतले असते तर? तर, तुझे हे डावपेच समजलच नसते कधी!

हे स्पष्ट झालंय की, तुला प्रत्येक माणूस वेगळा घडवायचा असतो. तुझ्या निर्मीतीच गमक आहे ते.
त्यापुढेे जगाने नतमस्तक व्हायला हवंय तुला.
एकासारखं दुसर्‍याचं आयुष्य विणलंस,
सगळ्यांना समान आयुष्य दिलंस तर निर्मीतीला महान कोण म्हणेल?
आम्हा सामान्यांना वाटेल, तुझ्याकडे साचा आहे, ओतलं मिश्रण, झाला तयार माणूस. त्याचं, तिचं, माझं, सगळ्याचं आयुष्य अगदी समान. काही वेगळेपणाच नाही... मग तुझं देवत्व मान्य कुणी करायचं? तू कलावंत आहेस. जेता!
म्हणूनच हार नको होती तुला.
मग तू  स्वत:चं काम सोपं काम केलंस.
संवेदनांचं मीटर योजलंस, आणि वाटल्यास संवेदना.
कुणाला कमी, कुणाला अधिक!
त्या जाणवून घेण्याची उमज वेगवेगळी दिलीस... बास!
मग भाव भावनांच्या एका चकव्यात प्रत्येकाला सोडून दिलंस.
चकव्यात मांडल्यास अनेक रंगाच्या खुणा, रस्ता चुकवण्यासाठी... आम्हाला चकवण्यासाठी.
कुणी आजन्म त्यात अडकतो
कुणी सर्वांगाने जखमा घेऊन, रस्ता शोधून पल्याड जातो.
कुणी जिथून निघतो, तिथेच येतो, पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा!
तू मात्र रिकाम्या वेळेत खूर्चीला रेलून सारी मजा बघतोस!
कितीतरी रंग माझ्याही पुढ्यात दिलेस.
हरखून हरखून गेले
वाटलं प्रत्येक रंग माझा, 
चकव्याची मेख जाणलीय आपण, कधीही निघू अन पल्याड पोहोचू. मग मी चालण जरा थांबवलं.
रंगात हरवले!
मला प्रत्येक रंगात तू दिसलास!
तूच नाही का रंग लावलेस?
मग कसा रे एकही रंग तुझ्या बोटाला नाही लागलेला?
असा कसा अलिप्त तू? निर्विकार.
तिथेच आहेस, रंग हातात, हसू ओठात... 
पण ह्या रंगांचा, ह्या हसण्याचा तुझ्याशी संबंधच नसल्यागत नजर कशी तुझी?
मी मात्र गच्च कवटाळला प्रत्येक रंग.. 
इतका की आरपार गेलेत सगळे रंग,
काळीज मोरपंखी झालंय!

तुझ्या अलिप्तपणाचा एक हात फिरव ना काळजावर! जड होतात रे आता हे रंग सांभाळायला.
पांढरा दे, जपेन तो. मला माहिती आहे, शेवटी तोच देणार आहेस..
मला समजलेत रे तुझे सारे डाव!
ते समजूनही सगळं जीवापाड सांभाळ म्हणतोस?
खेळ मांडतोस,
उधळतोस,
अपूर्ण डावांची चटक आहे ना तुला? 
अर्धमेल्या श्वासांची धापही ऐकू येऊ नये, असा उंचच उंच तू. रंग तुझ्या रंगात सामावून जावेत इतका काळासावळा तू.
अलिप्ततेचा शुभ्र वेष करून मिष्किल हसत शांत उभं रहाणं तुलाच जमतं.
दे तो पांढरा मलाही, अंगभर ओढून घेऊ दे. लपेटून घेऊ दे. मुरवून घेऊ दे.. आणि
हे घे तुझं मोरपिस.......

मी चकवा ओलांडलाय!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments