Monday, 1 September 2014

मेंदी

कसा मान्य करू?
माझ्या हातावरल्या मेंदीवर तुझ्या एकट्याचा हक्क?

बारीक नक्षी काढत जात 
हात सजतो पूर्ण...
मेंदीची एक एक तार हातावर उतरताना
किती न काय डोळ्यांत तरळून जातं ...
मनाचं जगण्याशी एकवार हितगूज घडतं!!

बालपण सरतं,
तारुण्य ओसरतं,
मेंदीचं मनाशी हळवं नातं मात्र
तसंच... 
ताजं ..हिरवं.. 
नितळ... बरवं!

हातावरली तरार नक्षी मिटू नये म्हणून जपताना
जीवलगांना जपलेले सारे क्षण जागे होतात पुन्हा,
रंगतात नव्याने!
तिचा गंध लपेटून निजताना,
जगून घेतलेलं प्रत्येक स्त्री रूप साकारत राहतं डोळ्यासमोर!

शरीराचा सण मेंदी,
जिवंतपणाचं लक्षण मेंदी,
शकूनाचा साज मेंदी,
उधाण भावनांची गाज मेंदी
....हया जगण्याचा 'उत्सव' मेंदी!

जगणं जिवंत केलेल्या त्या
प्रत्येकाचा हक्क ना रे त्यावर...
कसा डावलू तो?
आणि कसा मान्य करू,

हातावरल्या मेंदीवर
तुझ्या एकट्याचा हक्क?

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...