रंगरंगिले छैलछबिले

...आणि शेवटची घंटा वाजली.... "शाळा सुटली...." चा कल्लोळ मनात होत भराभर वह्या पुस्तकं दप्तरात जाऊ लागली.... नऊ-दहा जणांची एकमेकांशी नजरानजर होताच शाळेतून सटकण्याची लगबग आणखीनच वाढली.... दप्तराचा एक पट्टा खांद्याला, दुसर्‍या हातात वॉटरबॅग कशी-बशी उचलून दाराकडे वळणार्‍या पावलांचा वेग वाढणार... इतक्यात.. दारातून जोशीबाई प्रवेश करत्या झाल्याच.... मघाशच्या नजरा पुन्हा भिडल्या... नाराजी सुस्पष्टपणे ओसंडली!!

"नाटकामध्ये सहभागी असणार्‍या सर्व मुला मूलींनी, आज दुपारी ३ वाजता जुन्या लायब्ररी मध्ये जमायचे आहे. आता १२.३० वाजलेत, तेव्हा सर्वांनी घरी जाऊन, जेवण करून परत यायचे आहे.... घरी सांगून या की आज ७ वाजेपर्यंत सराव चालेल, तेव्हा आई-बाबांपैकी कुणीतरी  तुम्हाला न्यायला यावे, हे ही सांगा... आणि
बरोबर ३ म्हणजे....  ३"

शिडशिडीत बांध्याच्या जोशीबाई आल्या तश्या निघूनही गेल्या.... काही वेळापूर्वी पटकन पळून गेलो असतो तर ही सूचनाच ऐकायला मिळाली नसती असे विचार करणारे ते खजील "दहा" आता पाय रेटत बाहेर पडू लागले...

त्यांचा आपापसात संवाद सुरू झाला, ह्या नाटकाच्या सरावामुळे हे सगळे एकमेकांच्या फार जवळ आले होते!

'शी!!! काय रे, पटकन पळून गेलो असतो तर?'
'फार तर फार आजचा सराव चूकला असता'
'हां आणि उद्या सकाळी प्रार्थनेच्या वेळेलाच जोशीबाईंनी पट्टीचा मार दिला असता, त्यापेक्षा सरावाला येऊ"
"अरे अजून किती सराव करायचा?? 11 पात्राचं नाटक! सगळ्यांना सगळ्यांचे संवाद पाठ झाले आहेत आता'
'यार रोज माझा होमवर्क अपूर्ण राहतोय'
'हे तर माझे शेवटचे नाटक बाबा, आता मी नाही भाग घेणार'
'तुला विचारून यादी बनते का, ज्यांची नावं जोशीबाई सुचावतात त्यांना नाटकात भाग घ्यावाच लागतो ना?'
'मी तर ह्या वर्षी पहिल्यांदाच निवडले गेलेय'
'हो, बाक़ी बर्‍यापैकी दरवर्षीचे ठरलेले कलाकारच असतात'
"कलाकार??"
ह्या शब्दावर हशा पिकला.... हे 'दहा' आता स्वतःला कलाकार वगैरे समजू लागले होते... आता काही वर्षांत आपण टिव्हीवरच्या नट नट्यांना मागे टाकू, अशी भावना जोपासत होते... त्याला कारणही सबळ होते, जोशीबाई अगदी नेटाने सराव करवून घेत होत्या... नाहीतर निव्वळ 9/10 वर्ष वयोगटाच्या मुलांकडून सुंदर कलाकारी, योग्य वेळेत योग्य डायलॉग्ज वदवून घेऊन त्यांनी ह्या चिमूरड्या 'इयत्ता चौथी ब' च्या नाठाळांकडून सर्वोत्तम काम काढून घेणे सोपे नव्हतेच, ते फक्त जोशीबाई'च' करू शकत होत्या.
 
--------------------------------------------------------------------------------------

"काय गं, काय करत आहेत बाई?" - अतिशय दबक्या आवाजातला सोनल चा प्रश्न

"इकडून तिकडे फिरत आहेत"- मी

"काही खरं नाही, त्या रागावल्या की अश्याच हात मागे बांधून फिरतात, तू जा ना आत, असे दारातून वाकून किती वेळ पहाणार?" असं म्हणत सोनलनं मला जवळ जवळ लायब्ररीत ढकललंच...

"काय गं, ३ वाजलेत?" - करड्या आवाजातला खडा सवाल जोशीबाईचा!

"अं.... नाही... हो... मी.... बोरं!"

"बोरं??"
शुभ्र कपाळावर आठ्यांचं जाळं, कपाळावरची टिकली त्या जाळ्यावर तरंगली...

"बाई, बोरं आणलीत, शेंबडी!!  तुम्हांला आवडता....."- माझ्या हातातली पुरचूंडी चौफेर उडाली... डोळे अधिकच तांबडे झाले बाईंचे  "तुझ्या बरोबर बाहेर कोण आहे??"

"अं...."

"मराठी कळतं ना?"

"ती... ती सोनाली..."

"कितींदा सांगितलं... सरावाच्या ठिकाणी पात्रांची नावं घ्यायची, खरी नाही."

"सरस्वती आहे"

"तू कोण?"

"रंग पिवळा"

"तिला आत घेऊन ये"

आम्ही आत आलो.. एकमेकांच्या शेजारी उभ्या राहिलो, बाकीची "पात्रं" कुठे तडफडली म्हणत...

"करा सुरू सराव..."

आमच्या घामासकट चेहर्‍यावरून आश्चर्य ही वाहू लागलं असावं.
करा सुरूवात म्हणजे काय? अकरा पात्रांचं नाटक... उपस्थित पात्रे दोनच.. त्यात माझा प्रवेश तिसरा तर सरस्वतीचा शेवटचा... 

"पण जोशीबाई, बाकीचे अजून याय...." -इती सोनल....अहं सरस्वती.

"तुला नाटक पाठ नाही?"- बाई

"आहे पण..."- सरस्वती

"करा सुरूवात म्हणालेय मी"- बाई

मी क्षण ही न दवडता 'परी' ह्या पात्राचा प्रवेश साकारला, तिने तांबड्या रंगाचा, मी नारंगी, पिवळा... ती हिरवा... 
असे सुरू असता आम्ही दोघीही रंगात आलो...

बाई भान हरपून प्रत्येक संवाद, आमची संवादफेक निरखत होत्या. कधी चेहर्‍यावर पूसट समाधान तर कधी खटकल्याचे चिन्ह, कधी डोळ्यांनी "छान, चालू द्या" असे भाव तर कधी "अरे, नेमकं चाललय काय ह्यांचं?" अशी निराशा झिरपत...
त्यांच्या चेहर्‍यावर फक्त समाधान दिसावे ह्या इर्षेने आम्ही दोघी अगदी चढाओढीने एक एक पात्र जिवंत करत होतो. आम्ही नेमकं काय करतोय हे तेव्हा आमच्या ठायी ही नव्हतं, बाईंना खूष करायचं इतकं लहानगं ध्येय आणि दोघींना मिळवून खिंड लढवायची आहे आपले इतर मावळे पोहोचेपर्यंत इतूकीच समज असलेलं ते वय!

-बागेश्री
(क्रमश:)
 

Post a Comment

0 Comments