Thursday, 27 November 2014

पानगळ

आयुष्यातला पानगळीचा ऋतू होऊन आलास तेव्हा,
मी मुकाट पाहत राहिले तुझं जाणं..

एक एक करुन
प्रत्येक पान गळून गेलं
साकारलेला
नग्नतेचा कोरडा आविष्कार
जगवत राहिले अनिच्छेने
जगणं थांबलं नाही
ऋतू बदलला

घोंगावणाऱ्या काळ्या मेघाने
बहराची साद घातली!
कोंबांनी घाई केली

गळून गेलेल्या पानांची
माती झाली होती,
त्यातूनच झिरपलं
मुळांमध्ये पाणी....

तूच फूलून येणार आहेस!
तूच गळून जाणार आहेस...

प्रत्येक पानगळीत मी मात्र पुन्हा पुन्हा झुरणार आहे,
हिरवं अलवण मिळवण्यासाठी वठेपर्यंत सोसणार आहे..

-बागेश्री

No comments:

Post a Comment