गाठोडं

तिच्याकडे आणि तिच्या इच्छांकडे तो पाठ फिरवून चालू लागल्यानंतर तिने गाठोडं बांधायला घेतलं

एक एक इच्छांना हळूवार घड्या घालत
त्यात अत्तराचा फाया सारला..
निर्लेप झाली!

कधी जळमटं काढताना,
माळावरच्या गाठोड्यावर नजर पडली तरी हळवी होइनाशी झाली..

कधीतरी वाटतं तिला,
ते बोचकं छातीशी घट्ट धरून निघून जावं
सुख दु:खाच्या आवर्तापार...
आणि करून टाकाव्यात अर्पण एकेक इच्छा नर्मदेला, कायमच्या.
त्यातला गंधही मोकळा होईल, तरंगेल नर्मदेवर!
ती सारे पोटात घेण्यास समर्थ आहे...

कुणाच्या हाकेने तिची तंद्री भंगते तेव्हा,
त्याच्या क्षणांतून अखंड वाहत राहण्याची शपथ तिला संसारात ओढून नेते.....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments