अशीच बाळा, असते आई!

मला न कळते
तुझी साउली
अशी कशी गं 
सोबत माझ्या
सातत्याने 
येतच असते,
नसतेस जरी 
तू आसपास
पण ऊब तुझ्या
ओल्या मिठिची
माझ्याच रुक्ष   
अस्तित्त्वाला
बिलगुन असते!

किती कितीदा
घडते असे कि 
समजत नाही
काय खरे अन
कुठले खोटे  
तरी विसंबुन 
स्वतःवरच मी
रेटत जेव्हा
जगणे नेते,
हाक तुझी मग 
येते कानी
मनास हळवी    
फुंकर बसते..!

मला सांग ना
जमतेच कसे
तुला वागणे 
असे विल़क्षण
आहेस कोण
तु किमयागार  
कि तुला कुठली
जादू येते?  
तुझी आठवण
उचलुन घेते
अवघड जेव्हा
प्रसंग येई...!

म्हणतेस सदा,
"अशीच बाळा
असते आई,
अशीच बाळा
असते आई...!"

-बागेश्री

Post a Comment

1 Comments