इतकंच

ती जागीच धुमसते
हादर्‍याचे धक्के
काही रिस्टर स्केलवर मोजले जातात
मोजता येईल अशी हानी असते
भरून येणाची खात्रीही
इपीसेंटर हुळहूळत राहतं
त्याच्या आजपासची वस्ती उठते, इतकंच....

कधी गार पाण्याखाची जमीन भेगाळते!
सागराचा डोह ढवळून निघतो
जमिनीला गिळू पाहतो
त्सुनामीच्या नावाखाली
नासधूसीची नोंद होते,
मोजता येईल अशी हानी असते
भरून येणाची खात्रीही.
खवळलेला समुद्र काहीबाही गिळून पुन्हा शांत होतो, इतकंच....

कधीतरी तिच्यातला लाव्हा 
उसळी मारून बाहेर येतो
भळभळत राहतो
आसपासचं जाळतो.
मोजता येईल अशी हानी असते
ती भरून येणाची खात्रीही.
सुप्त ज्वालामुखी आग ओकून शांत होतो, इतकंच....

तिचा असा सारा मन:स्ताप
व्यक्त होतो.
शांत होतो.
ती पुन्हा माय होते.
आस्थेने जगाला जगवत जाते.
नाही जमत तिला, तिचं गुरुत्वाकर्षण त्यागून निसटून जायला.
सारं सोसत, इथेच राहण्याचा शाप आहे तिला

आताशा ग्लोबल वॉर्मिंग झालंय.
तिची घुसमट यूनिवर्सल झाली आहे.
कधीही, कुठेही, काहीही घडू शकतं
अशी तिची तगमग सार्वभौमत्वाला पोहोचली आहे.
एक वेळ येईल,
तिला हे गुरूत्वाकर्षण त्यागावंच लागेल.
तेव्हा मात्र तिची उसळी, आकाशगंगेबाहेर जाईल.
नाही फिरणार ती स्वतःभोवती,
नेमून दिलेल्या सूर्याभोवती....

तिला तिच्या हक्काचं आकाश गवसावं, इतकंच......

-बागेश्री

Post a Comment

0 Comments