आसरा

.....आणि तिने तानपुरा खाली ठेवला... ठेवताना झालेला झंकार, खोलीच्या चारही भिंतीना धडकून परतला...
आजही तिची माळावरची खोली सुरांनी न्हाऊन निघाली....
तानपुरा खाली ठेवल्याचा 'ओळखीचा' झंकार ऐकताच दाराबाहेर उभी असलेली राधा दार ढकलून आत आली, रोजचे परवलीचे शब्द तिने उच्चारले, "बाईसाहेब, न्याहारी ठेवलीये आणि हळदीचं दुध पण.."
आल्यापावली राधा परतली...
आणि रोखून धरलेले उष्ण अश्रू त्या गव्हाळ गालांवर ओघळले....
तिनं त्या तानपुर्‍यावर मन रितं केलं होतं, पण कुठलसं दु:ख गालांवर ओघळत राहिलं...
डोळ्यांतून वाहणारी भावना अन भरून उरलेली विषण्णता....
हेच का जगण होतं?
असच का जगायचं होतं?
फिरून माझ्या हाती "शून्यच" का?
माझं कुठे चुकलं होतं? १६ वर्षांच्या तपश्चर्येचं हेच फळ?
'निर्णय', माझा निर्णय ??
कित्ती प्रश्न आणि न गवसणारी उत्तरं....
गलबलून आला तिचा उर... जड झाले तिला तिचेच विचार... पुन्हा तानपुरा उचलला गेला.... आणि... 'मी तुझी राधिका, मी तुझी प्रेमिका ...' ती आळवत राहिली....
कंठातून सूर अन डोळ्यांतून पाणी झिरपत राहिलं....
...खालच्या मजल्यावर दिवाणखोली मध्ये उभी असलेली राधा,बावचळली!
.. सकाळच्या रियाजानंतर बंद झालेला तानपुरा, दुसर्‍या दिवशीपर्यंत वाजत नसे....
मग आज हे काय? रियाज संपूनही तानपुर्‍याचा आवाज?
अन किती ते आवाजातलं दु:खं... पण माळावर जाऊन बाईसाहेबांना विचाराची हिम्मत झाली नाही तिला...
राधा बंगल्याबाहेरच्या बागेकडे वळाली....
बंगल्या भोवतालची ती अतिप्रशस्त बाग.... मुख्य प्रवेशद्वारापासून ते बाहेरच्या गेट पर्यंत गेलेली स्वच्छ वाट, मातीचीच, पण छान सडा घातलेली... त्या पाऊलवाटेच्या दुतर्फा सजलेली ती बाग!!
डाव्या बाजूला जाई- जुईच्या नाजूक वेली तर उजव्या बाजूस बाईसाहेबांनी जपलेले विविघ रंगाच्या गुलाबांचे ताटवे त्यातले गुलाबी, केशरी गुलाब तिने अलवार हातानी खुडले...
माळी काका जाई- जुईच्या वेलींना पाणी पाजत होते, राधा पुढ्यात येताच त्यांनी तिला खुडून ठेवलेली नाजूक फुलं दिली.. परडीत फुलं भरून राधेने बंगल्याच्या मागच्या बाजूस जाऊन जास्वंदाची लाल चुटूक फुलं खुडली....
बंगल्यामागे येताच बाईसाहेबांच्या खोलीतून येणारे स्वर पुन्हा तिच्या कानी पडले...अस्वस्थ झाली ती.. पण; यंत्रवत तिची रोजची कामं सुरु होती....
परसदारातून ती बंगल्यातल्या दिवाणखान्यात शिरली.....
वरच्या मजल्यावर जाणाऱ्या सागवानी पायर्यांखाली ते परसदार उघडत असे.... तिथे आल्याबरोबर वरून येणार्‍या स्वरांची तीव्रता अधिकच जाणवली...
उजव्या हाताशी ठेवलेल्या भल्या-मोठ्या शिसवी टेबलावर फुलांची परडी ठेवून ती स्वयंपाक घराकडे वळाली.... सक्काळीच आलेलं दूध तापवायला ठेऊन ती पुन्हा बाहेर आली....
राधा ह्या घराची १५ वर्षांपासूनची सोबतीण.... नवर्‍यासोबत काडीमोड झाल्यानंतर पोटापाण्याची व्यवस्था पाहायला निघालेल्या 'एकल्या' राधेला बाईसाहेबांनी आधार दिला... ह्या घरातली सारी लहान- मोठी कामे करत, स्वयंपाक-घर सांभाळत राधा सुखाचं आयुष्य जगत होती....
फुलांच्या परडीतून जास्वंदाच लालबुंद- टपोरं फुल राधेने निवडलं, अन मुख्य प्रवेशद्वाराच्या वर लावलेल्या "गणरायाच्या' तसबिरीला वहिलं ...
तिला त्या दिवाणखान्याच्या ठेवणीच नेहमीच कौतुक वाटायचं...
त्या दिवाणखान्याची रचना आणि बाईसाहेबांनी जपलेला टापटीपपणा वाखाणण्याजोगाच होता!!
मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला भारतीय लोड-तक्क्यांची बैठक, त्यावर शुभ्र पांढरी चादर, त्या बैठकीच्या समोर अर्धगोलाकार असा सोफा, त्याला साजेश्या उश्या त्यावर ... भारतीय बैठक आणि सोफ्याच्या मधोमध काचेचं बसकं टेबल... त्यावर लाल-निळ्या रंगाची फुलदाणी!
खोलीच्या उजव्या भिंतीवर टांगलेल्या सुंदर चित्रकृती.... निसर्गाच्या आणि काही ऐतिहासिक प्रसंगांच्या!!
ह्या दिवाणखान्याच्या शेवटच्या डाव्या कोपर्‍यात, माळावर जाणारा जिना- माळावर दोनच खोल्या- दोन्ही स्वतंत्र, एक बाई साहेबांच्या रियाजाची अन दुसरी कायमच बंद असलेली!!
जिन्याच्या बरोबर खाली परसदार, त्या दाराच्या डावीकडे बाईसाहेबांची राहती खोली... आणि दाराच्या उजव्या बाजूला खूपच 'जुनं' पण रेखीव शिसवी टेबल....
दिवाणखान्याच्या उजव्या कोपर्‍यात स्वयंपाकघर, त्याला लागून "पाहुण्यांसाठीची" राखीव खोली...
स्वयंपाकघर पाहताच राधेला दुध तापायला ठेवल्याची आठवण झाली अन लगबगीने ती धावली....
दुधाचं आधण बंद करून, पातेल्यावर झाकण ठेऊन ती बाहेर आली... वरून येणार्‍या बाईसाहेबांच्या आवाजातली धार जरा कमी झाली होती, सोफ्यांच्या जवळ पोहोचून तिनं उश्यांची अभ्रे बदलायला घेतली... बाईसाहेबांना आवडणारे गुलाबी अभ्रे चढवताना तिला राहून-राहून वाटत होतं, आज काहीतरी बिनसलंय नक्की....
स्वत:शीच विचार करती झाली राधा, अस काय लागलंय बाईसाहेबांच्या मनाला की “पंधरा” वर्षांपासून अखंड चालणारा त्यांचा दिनक्रम पार बिघडलंय आज? काल-आणि-आज मध्ये वेगळं काही घडलंय का?
काल घरी 'तो' आगंतुक पाहुणा आलाय.... त्यामुळे तर नसेल?
पण; येणार्‍या- जाणार्‍या वाटसरुना आश्रय देण- हे बाई साहेब गेली १५ वर्षे करतच आहेत! अन त्यामुळेच ह्या बंगल्याचं नावही 'आसरा' ठेवलंय....विशेष काय त्यात?
पण मग, बाईसाहेबानी 'त्याला' माळावरची खोली द्यायला सांगितली!!... ती 'बंद' खोली काल स्वच्छ करण्यात आली...
त्याच्यासाठी??
माळावर फक्त नि फक्त बाईसाहेबांचाच वावर! मला वर जायची अनुमती होती ते निव्वळ त्यांची न्याहारी अन दुध पोहोचतं करण्यापुरती!!
काल-नी-आज मध्ये एवढाच घडलंय! तो घरात आलाय... आसर्‍यापुरता! ... पण मग तो 'आगंतुक' नाहीय्ये का? 'तो' कुणी खास आहे का? बाईसाहेबांच्या ओळखीचा कुणी?
पण त्या तर 'त्याच्याशी' चक्कार शब्दही बोलल्या नाहीत... फक्त 'त्याला' पाहताच चेहरा किंचित आक्रसला त्यांचा... बास! त्यावेगळी काहीच प्रतिक्रिया नाही...
"राधाsss,......."
बाईसाहेबांचा आवाज ऐकताच ती दचकली... विचारांतून जागी झाली...
"राधा, आश्रयासाठी आलेल्या पाहुण्यांना न्याहारी द्यायची पद्धत आहे ह्या घराची, विसरलीस?"
"बाईसाहेब, त्यांची खोली अजूनही बंदच आहे, म्हणून गेले नाही वर.... तुमची न्याहारी आटोपली? टेकडीवर फिरायला निघायचं, रोजच्या सारखं?"
"नाही राधा, आज 'रोज' च्या सारखं काहीही नकोय , तू घरीच थांब, मी नदी काठच्या देवळात जाऊन येत्ये! आणि हो, आज मी न्याहारी पण नाही केली आहे, ते घेऊन जा स्वयंपाक घरात, पाहुण्याची निट सोय बघ...! त्यांच्या न्याहारी साठी काय बनवलं आहेस?"
"उपमा, बनवलाय!"
"उपमा? छे छे.... साजूक तुपातला शिरा करून दे.... मी निघतेय माझं आवरून...."
राधा, स्वत:शीच पुटपुटली, 'शिरा? तुपातला? पाहुण्यांना?'
ह्या घराचा नियम होता, आसर्‍यापुरत्या राहणार्‍या वाटसरूंना न्याहारी साठी 'पोहे किंवा उपमा' अन जेवण मात्र साग्रसंगीत...
पण; तुपातला शिरा पहिल्यांदाच होणार होता...
'तो' आहे तरी कोण?? कुतूहलापोटी तिने माळीकाकांना देखील विचारलं.... पण; ते गप्पच राहिले, माळीकाका ह्या घरात, राधा येण्याधीपासून कामाला होते... पण ते गप्प राहिले तेव्हा तिला आणखीनच खटकलं...
बाईसाहेब स्वतःचं आवरून बाहेर आल्या, राधा 'रोजच्यासारखी' पाहतच राहिली,
ती गव्हाळ कांती, अन् त्यावर खुलून दिसणारी अंजिरी रंगाची तलम साडी, गळ्यात साधीच पण नाजुक मोत्याची माळ अन् कानात बुंदके मोती... कपाळावर रेखीव छोटंसं गंध, चालण्यातलं मार्दव, किती साध्या राहत असत त्या, साधरण ४५ वय असावं त्यांचं पण कश्या सतेज दिसत, त्या तिला नेहमीच आवडत...
एका साध्वीचं जिणं जगणार्‍या, तिच्या बाईसाहेब सार्‍या गावाच्या लाडक्या होत्या, ते त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीमुळेच.. त्यांचा भुत़काळ अगम्य होता पण, ह्या बंगल्याच्या त्या 'बाईसाहेब'' होत्या!!
"राधा, फुलांची परडी दे, आणि कुंकवाचा करंडा, आलेच मी जाऊन देवळात....."
त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात राधा स्वयंपाकघरात शिरली... शिरा बनविण्यासाठी!
बंगल्यातून बाहेर पडताच, माळीकाकांनी बाईसाहेबांना हटकले
"बाई, मी येऊ तुमच्या संगट? बोलायचं हुतं जरा? कालपास्नं म्या संदी शोधत हुतो, जीव लागना बगा माजा, 'त्येला' पाहिल्यापास्नं..."
"माळीकाका, कसला एव्हढा विचार करताय? अहो चालायचंच, तुमची बाई समर्थ आहे सार्‍या प्रसंगाला तोंड द्यायला...."
"व्हय गं माजी बाय, खरं हाय त्ये, पन तुमास्नी दुक्खात पाहवत न्हाय, आन काय म्हुन परत आलाय 'त्यो' ह्या घरात?"
"माहिती नाही काका, बोलले नाही मी अजून पाहुण्यांशी....!"
"पावणां? बाय माजी, कस गं करशील... लई काळ्जी हाय बग मला तुजी.. अग हाकून लाव त्येला तू काऊन घेत्लस घरात?"
"काका, गेली १५ वर्षे ह्या 'आसर्‍याने' सगळ्यांचा पाहुणचार केलाय... आणि 'तो...' तर.....
"बोल, किशुरी.... बोल.. मांज्यापशी मोकळी व्हय माय.. येऊ दे डोळा पानी....."
ती लगबगीने निघून गेली तिथून... तिला काकांसमोर खरचंच रडायचं नव्हतं..!
'किशुरी' शब्दानं ते हेलावली होती, 'बाईसाहेब' हे गोंदण कित्येक वर्षांपासून जपताना, तिचं तारुण्य कधीच प्रौढ झालं होतं.....
भाग 2
....भराभर पाव्लं उचलत ती निघाली, छातीशी पदर घट्ट आवळून... जणू सांडल्या असत्या भावना रस्ताभर, हातातले पत्र नकळत आणखीनच चूरगाळले गेले..!
पापणीतले पाणी कसेबसे परतवत, तीव्र गतीने रस्ता कापत ती देवळाच्या आवाराशी येऊन थांबली!
तिथे पोहोचताच, संथ नदीवरून आलेल्या हवेच्या झोताने जरासं हलकं वाटल्यासारखं झालं तिला.. 
देवळाच्या अगदी पायरीशीच बसली ती,
गर्द झाडाच्या साउलीत वसलेलं ते देऊळ!
समोर वाहती नदी, काठावरची लहान-मोठी झाडं, गार वार्याची येणारी सततची झुळूक....चित्त जरा शांत झालं तिचं...
कधी नव्हे ते आज, 'आसर्यात' घुसमटली होती ती.. स्वतःच्या घरात श्वास कोंडला होता.
देवळामागे उभ्या असलेल्या निलगीरीच्या झाडांची सळसळ ऐकत ती शांत बसून होती.
देवळात येणारा- जाणारा, तिला 'एकटीला' अशी पायरीशी पाहून स्तब्ध होत, तिला ओळख दाखविणारा नमस्कार करत आत देवदर्शनाला जाऊ लागला..
शांत वातावरणात घंटेचा नाद मंगलमय वाटत होता, मंदिरात दरवळणारा धूप अन् फुलांचा संमिश्र सुवास, तिला कुरवाळत होता!
आज 'एकटेपणाची' भावना तिला बोचत होती, भूतकाळ खूपत होता.
शांतपणे इतरांची सेवा करत कशाचीही तक्रार न करता जगणं हा तिचा स्वभावधर्म होऊन राहिला होता.. आज मात्र मनःशांती पूर्णतः कोलमडली. मनात एखाद्या प्रसंगाला तोंड देण्याची पूर्वतयारी नसली, की असं सैरभैर व्ह्यायला होतं, हे अनुभवत होती, खंतावत होती.
१६ वर्षांपूर्वीच्या काळ आज तिला न आठवला असता तर नवल; मन घट्ट करून मनातलं सगळ वैषम्य बाजूला सारून ज्या भूतकाळावर तिने मात केली, तोच आज दत्त म्हणून पुढ्यात उभा....
देवळातल्या वातावरणाचा, नदीवरल्या हवेचा तिला अपेक्षित परिणाम नकळत होत गेला, चित्तवृती शांत होत होत ती अंतर्मूख होत गेली... स्वतःशीच संवाद साधत...
नव-नवेली नवरीचा साज,
हातभर चुडा... हिरवीकंच साडी.. गडद रंगलेली मेहंदी... नाजूक पण उठावदार मंगळसूत्र... केसांचा गच्च अंबाडा अन त्यावर जाई-जुईचा गजरा...!!!
दादांनी माप ओलांडायला सांगितलं आणि मला ह्या बंगल्यात घेतलं,
गावच्या सरपंचाच्या इभ्रतीला शोभेल ह्या थाटात त्यांनी त्यांच्या सूनेला घरात आणलं...!
माझ्यासारख्या पोरक्या पोरीला त्यांनी सूनेपेक्षा जास्त लेकीसारखाच जीव लावला!
आई-बाबा तर कधी मला आठवलेच नाहीत, आठवलं ते फक्त 'पोरकेपण'!
आई-बाबांना देवाज्ञा झाल्यानंतर, सख्या काका- काकूंकडेच लहानाची मोठी झाले, काकू वाईट नव्हतीच कधी, पण; माझा तिच्या घरी येण्याचा आणि तिच्या पोटच्या मुलीला त्याच सुमारास आजारी पडण्याचा, त्या आजारपणात जीव गमावण्याचा तीने विचित्र संबध जोडला होता.
एखाद्या पोरक्या मूलीला कुणी संगोपन देऊ करतं, तेव्हा त्या उपकाराखाली वाढताना, समंजसपणा अगदी स्वभाव होऊनच जात असावा....
काकू देईल ते काम मूकपणे करताना काकांसोबत संगीताचे धडे गिरवले.
काका फार लाघवी पण उच्च दर्जाचे शास्त्रीय संगीत गायक होते, त्यांच्या गायकीत सारे रस अचूक उतरत..
काकांच्या सोबत कार्यक्रम करता- करता मी ही गायला लागले, आधी निव्वळ काकांची साथ म्हणून, नंतर स्वतंत्र गायिका म्हणून!
माझी शैक्षणिक प्रगती आणि गायिका म्हणून मिळणारे नाव, काकूला दिवसेंदिवस खुपू लागले, घरातली पडेल ती कामं करूनही ह्या ना त्या कारणांवरून तिचा आवाज चढत असे... अपमानाशिवाय काही मिळत नसे...
"हिला उजवून टाका एकदाची आणि मुक्त व्हा" असे ती सारखी काकांना ऐकवे.
काकांच्या प्रेमळ वागणूकीमुळे, सगळे त्रास सहन करता य्त होते, बालपण, तारूण्य, स्वप्न, धूंदी असे काही अनुभवलेच नाही. सतत आपल्यामुळे कुणाला त्रास न व्हावा ह्या काळजीने वागताना मनावर दडपण घेऊन वाढले.
आयुष्य साधं-सरळ-सोपं कधी असतं?
तो तर आकाशपाळणा आहे... क्षणात खाली, तर क्षणात वर!
तुम्हालाही उंच जायला मिळणार, उंच जाताना पोटात फुलपाखरं भिरभिरणार, थंड हवा, नजरेत येणारा भला मोठा परिसर, आकाशाच्या जरा जवळ गेल्याची भावना.... सगळं मिळणार तुम्हाला...  
तसंच झालं!
माझा पाळणा वर जाऊ पहात होता.....
एके दिवशी अचानक 'राजीव' घरी आले.....!
"किशोरींचे घर हेच का?"
"होsss, य्या आत, ह्याच घरात तुकडे मोडते त्ती!"
काकूच्या चढल्या आवाजाने मी आणि काका बाहेर आलो, काकांनी काकूला घरात पाठवलं,
"या, बसा, कोण आपण?" काका
"मी राजीव, चंदनपूरच्या सरपंचांचा मुलगा, जरा बोलायचं होतं, तुम्ही किशोरीचे वडील का?"
"हो, तिच्या वडिलांसारखाच, बोला, कुठे कार्यक्रम आहे काय? निमंत्रणाला आलात?"
बिनधास्त खळाळून हसत राजीव म्हणाला...
"नाही, नाही! आज दुपारच्या किशोरींच्या आणि तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, दुर्गापूरात.....! पत्ता काढत घरी आलो आहे तुमच्या ह्या किशोरींचा हात मागायला, त्यांना माझी धर्मपत्नी करू इच्छितो, ह्या सूरसम्राज्ञीला आमच्या बंगल्याची 'राणी' करू इच्छितो....."
आम्ही अवाक्क! कुणी घरी येतो काय? स्वतःला सरपंचाचा मुलगा म्हणवतो काय, फार काही प्रस्तावना देण्याची गरज न समजता, थेट लग्नाबद्दल बोलतो काय??
"अहो, राजीवसाहेब, पण......"
"हो काका, तुम्हाला वाटेल, ह्या सार्या गोष्टी वडीलधार्यांनी करायला हव्यात, पण काय करता, मी हा असा 'लहरी'... मनात आलं, ठरवलं आणि कृतीत आणलं, असा स्वभाव...... होकार हवाय तुमचा"
बापरे.....
मी प्रचंड चकित झले, केव्हढा तो आत्मविश्वास? तो निर्धार, ती बोलण्यातली तडफ, तो प्रामाणिकपणा- की मी हा आहे- असा आहे!! हा नेमका कोण? असा कसा दारात येऊन उभा? लग्न अशी ठरतात कुठे?
एका क्षणार्धात आपण किते विचार करतो? किती शक्यता पडताळतो?
चंदनपूर कसे आहे गाव? हा खरेच सरपंचाचा मुलगा आहे? अन् बरं नसला, तरी काय? लग्न आज ना उद्या करायचेच आहे, स्वतःहून मागणी घालतो म्हटल्यावर काका काकूना खर्च पडणार नाही, आपली त्यांच्या मागची ब्याद सहज टळेलही... त्यांना जरा मोकळा श्वास.
इकडे नजर राजीववर टिकली होती-
दिसण्यातला रूबाब तर अवर्णनीयच.....
सारं पाहून वाटलं की,
मनात दडपून टाकलेलं स्वप्नच आज कोषातून अलगद बाहेर येतय, पाखरू झालंय त्याचं, पाखराचं रुपांतर हलकेच 'राजीव' मधे झालं, काही क्षणात लक्ष रंग दिसले
प्रसन्न आस्त्तित्त्व, विचार करत बोलण्याची लकब, निखळ हास्य आणि......त्याचे चमकदार डोळे माझ्यावर पडताच मी एकदम भानावर आले..
काका तर स्तब्धच!!!!!
पोरीचा 'उद्धार' करणाराच जणू चालत घरी आलाय असं वाटलं असावं त्यांना
"राजीवसाहेब, पण..."
"ठीक आहे, तुम्हाला बराच विचार करावा असे वाटते आहे बहुधा, मला जे वाटलं ते सांगायला आलो होतो, तुम्ही विचार करावा...तसा मी तुमचा होकार गृहीत धरतोय, दादा येतीलच पुढील बोलणी करायला....."
" ह्या पोरीला द्यायला माझ्याजवळ काही नाही, चांगलं शिक्षण देऊ शकलो फक्त! आमची 'ही' कितीही विरोधात होती- तरी प्रसंगी पोटाला चिमटा काढून हिला मी शिकवलंय आणि माझ्या गायनाची विद्या सढळ हातानी दिलीये तिला मी....बास.. इतकेच आहे गाठीशी"
"काका, आज त्या गायकीच्या ताकदीनेच तर मला खेचून आणलंय इथे...
पुन्हा दिलखूलास हसले राजीव- जणू त्या विश्वात इतर कुणाला काही किंमत नाहीच, मला तू आवडलीस, तुझ्या गायकीतली प्रतिभा दमदार आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय, तुझा होकार असेलच.... कमाल सगळीच!!!
येतो मी! किशोरी, तुम्हाला घेऊन जायलाच येईन आता...."
बापरे, क्षणांत नव्हत्याच "होतं" झालं होतं...! आनंद व्हावा का? ह्या प्रश्नांत गुरफटले...
आणि कालचक्र गतिमान झालं
वेळ बदलली, की सुखही येत असावं आपसूक नांदायला..
दादा आले,
बोलणी झाली,
मुहूर्त ठरले,
जागा ठरली,
"फक्त मूलगी द्या- तिला आम्ही जपू" आश्वसक शब्दांची देवाण- घेवाण झाली.
काका धन्य झाले, भरून पावले... पोरीचं भाग्य बदललं, तिला सुखी बालपण नाही पण सुखाचं सासर देतोय ह्या विचारात समाधानी दिसले, लग्नभर डोळ्यांच पाणी खळलं नाही..
काकू आशीर्वाद देण्यापूरतीही आली नाही मंडपात... काकांनीच कन्यादन केलं!
"दादा"
चंदनपूराचं एक मानलेलं 'बडं' प्रस्थ!
शिस्तप्रिय, न्यायप्रिय, जनप्रिय असे!
त्यांची सून होण्याचं भाग्य मला लाभलं!
त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं माझं लग्न झालं.....
आयुष्य बदलतं म्हणतात लग्नानंतर पण; इतकं? दाट अंधारातून प्रखर प्रकाशात?
एका लहानग्या घरातून चक्क महालात प्रवेशले मी,
माप ओलांडून बंगल्यात शिरताना दादा म्हणाले, "सूनबाई, तुझ्या रुपात मालकीण आली ह्या ऐशर्याला...."
'ही' गेल्यापासून पोरकं होतं हे घर आणि राजीवही... सांभाळ सारी सत्ता आता, मी निर्धास्त झालोय...!!"
खरंच, दादांनी काय नाही दिलं मला....?
आधी तर माळावरची खोली- माझ्या रियाजासाठी, 'एक स्वतंत्र खोली!' फार मोठी भेट ती.
घरात चाकर माणसांचा राबता...
मला माझ्या भाग्यावर, राजीवच्या हास्यावर, दादांच्या असण्यावर, बंगल्याच्या आस्तित्त्वावर कशा म्हणून कशावर विश्वास बसत नव्हता...! 
सारं खरं आहे का? हे सारं माझं आहे का? हेच उमजत नव्हतं, अनेक दिवस.
हळू-हळू सरावले, नव्या आयूष्याला....
मालकीण बनून वावरू लागले...
रुबाबात वावरताना मनात काकांची आठवण मात्र सतत ताजी राहिली...
पण, आकाशपाळणा खाली येण्याची वेळ आलीच असावी..
प्रखर प्रकाशाची सवय नसलेल्या मला अंधाराने जवळ करण क्रमप्राप्त असेल.
जसे जसे दिवस सरू लागले, सगळयांचे स्वभाव समजू लागले, ह्यांचा स्वभाव खटकू लागला
लग्नानंतर मी माझा रियाज अन गावोगावची कार्यक्रमं मात्र सुरू ठेवली ते दादांची हरकत नव्हती म्हणूनच.. परंतू 'हे' कधी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत...
आग्रह केला की अंगावर ओरडून म्हणायचे, "तुझी तू जा ना.... मी अडवलंय? माझ्या का मागे लागतेस? माझे पुष्कळ व्याप आहेत माझ्यामागे..."
ते फारच आनंदात असले की मला घेऊन, सांयकाळी टेकडीवर फिरयला जात, गावच्या टेकडीवर! मग भरभरुन बोलत असत... त्यांच्या बालपणाबद्दल, आईच्या अवेळी जाण्याबद्दल, दादांच्या स्वभावबद्दल..!!
ह्यातून समजत गेलं की,
दादा फारच जास्त शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते आणि आई मात्र फार प्रेमळ व इतरांना मदत करण्याच्या प्रवृत्तीच्या होत्या... पैसा कमाविणे व मोजका खर्च ह्यावर दादांचा भर होता तर सढळ हस्ते दान हा आईंचा खाक्या...
कुठल्याश्या आजारपणात एकाएकी आईंचे देहावसान झाल्यापासून राजीव अगदी लहानपणीच एकटे पडले.. फारसे मित्रही नव्हते त्यांना, एकटं राहणं, एकट्यानेच अभ्यास करणं, खेळण्यात फारशी नसलेली आवड आणि घरातला दादांचा काटेकोर स्वभाव ह्याने 'लहरी' स्वभाव झाला राजीवचा.
शालेय शिक्षण चंदनपुरात घेऊन, शहरी जाऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करून येताच, दादांनी ह्यांना घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सांगितलं, स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा व कूवत असतानाही दादांनी राजीवला विरोध केला... आणि "घरची शेती असताना, नवा व्यवसाय थाटायचा नाही, माझ्याकडून दमडी मिळणार नाही" असा दादांचा सूर होता!
ह्या एकांगी वागण्याने तर, दादा आणि राजीव मधे हवाही ठरत नसे! दोघे फारसे बोलतही नसत  .. दोघांचही आप-आपल्यापूरतं विश्व होतं. दादा दिवसभर ग्रामपंचायतीच्या कामात मग्न तर राजीव शेतकीच्या.
दादा घरातले कर्ते..! त्या पदामुळे नकळत जरासे हेकेखोर- म्हणजे, 'मी म्हणेन ती पूर्व', असे.
त्यांचा शब्द पडू दिलेला त्यांना पटत नसे आणि त्यांच्या ह्याच वागण्यामुळे दिवसेंदिवस बंडखोर होत गेलेले राजीव
दादांच्या विरूद्ध स्वतःचं असं एक वेगळं मत, सतत मांडत राहणारे, राजीव!!
अन् ह्या सगळ्यांचा परिणाम, म्हणजे माझं लग्न..!
दादांना संधीच न देता एका अतिसामान्य घरातील मुलीशी सरळ स्वत:चं लग्न ठरवून गावात घोषणा करणारे राजीवसाहेब आणि स्वतःची गावातली प्रतिमा ढळू नये, म्हणून होकार देणारे दादा!
ह्यांनी ठरवलं आणि पर्याय नाही म्हणून दादांनी पैसा ओतला.........बास!!
कित्येकदा घुसमटत असे जीव, 'एकत्र खाली मान घालून जेवणे'... सासरी जे, तेच माहेरी ही!
माणसा-माणसातली दरी अशी का वाढत जाते? 'गरज' बांधून ठेवते एकमेकांना? आस्तित्वाचं महत्त्व शुन्य?
स्वतःचा व्यवसाय सुरू करायला पुरेसे पैसे नाहीत म्हणून,
हे घर दादांचं आहे- राजीव त्यांचा वारस आहे म्हणून,
आणि मी ह्या घराची सून आहे म्हणून,
आम्ही तिघे एकत्र!
त्रास त्रास व्हायचा, एवढ्या मोठ्या घरात बोलणं मोजकचं, हसणं तर त्याहून मोजकं!
ह्या दोघांना एकत्र आणायचा केलेला प्रत्येक प्रयत्न माझ्या आणि राजीवमधील भांडणात परिवर्तित होत असे
..... "जे सुख पदरात टाकलंय ते उपभोग आणि गप्प रहा" असा नेहमीचा शेवट....!
निव्वळ एकाच वर्षात, आम्ही दोघे एकमेकांना परके झालो, घरतल्या गढूळ वातावरणामुळे....
आणि ह्या सार्याचं पर्यावसान नको त्या गोष्टीत घडलं.........!
-----*---
#कथा आसरा भाग 3
...भरपूर मालमत्ता घेऊन राजीव घरातून परागंदा झाले, शेतकीचा व्यवसाय त्यांना जमणार नव्हताच...  पण राजीव्च्या एकाएकी असा पद्धतीने पसार होण्याच्या धक्क्यामुळे दादांनी हाय खाल्ली!
त्यांना शोधण्याचे दादांनी सारे प्रयत्न केले, गाव अन् गाव धुंडाळलं..
प्रत्येक वेळेस निराशाजनक खबर ऐकताच ते खचत गेले..... खचतच गेले... माझ्याशीही बोलेनासे झाले, दुरावले पार!
"माझ्या हट्टापायी माझ्या मुलाचा संसार मोडला" असा शोक करत राहिले!
मला माणसाच्या अजून एका पैलूचं दर्शन झालं, रक्ताची नाती नाही दुरावत ताटकन, हे जाणवलं आणि अनेक प्रश्न गाठीला आले..
-राजीव निघून गेल्यावर इतके हवालदिल झालेल्या दादांनी, मग राजीवच्या 'व्यवसाय करू द्या' ह्या इच्छेला कधीच का मान दिला नाही, की राजीव आपल्याला सोडून जाऊच शकत नाही, हे त्यांनी गृहीत धरलं होतं?
-राजीव गेल्याचा मला का धक्का बसला नाही, की मी असं काही होऊ शकतं, हे गृहीत धरलं होतं?
-दादाना नेमका कशाचा धक्का बसला आहे? पोटचं पोर सोसून गेल्याने इभ्रतीला धक्का, की बापाच्या नाकावर टिच्चून पैसा घेऊन पोरगं चक्क पळून गेलं, गावात नाचक्की झाली, याचा?
धक्का कशाचा का असेना, राजीवचा पत्ता लागत नव्हता, दादा खचत होते, त्यांनी ग्रामपंचायतीत जाणं सोडलं, वृत्तपत्रात बातमी दिली, 'घरी परतला नाहीस तर अन्न-पाणी त्यागतो' असेही छापले, पण नाही... राजीव कुण्या देशी होते, कुणास ठाऊक...
होत्याचं 'नव्हतं' झालं!! दादांनी जग सोडलं! शोक करत करत, खचत जाऊन दादा निघून गेले
आकाशपाळणा हिंदकळला, आयुष्य पुन्हा एकदा ढवळून निघालं
मला पुन्हा एकदा पोरकी करत...!!
राजीवनं आयुष्यात मला लिहीलेली दोन पत्रे! एक घर सोडून जातानाचे आणि एक आज परतून आल्यावर!
फक्त शब्द एकाद्याचं जगणं, विफल करू शकतात का, तर हो... करतात खरेच
घर सोडून जातांना राजीवने माझ्या उशाशी ठेवलेल्या त्या पत्राचे, गेल्या १६ वर्षांत मी लाख वेळा पारायणं केली असतील.....त्यातला शब्द न शब्द पाठ झालाय, अंतरंगावर कोरला गेलाय
>>>>>>
किशोरी,
तुला 'प्रिय' म्हणण्याइतपतही सख्य जाणवत नाही आज....
मी घर सोडून जातोय! कदाचित कायमचा! मला माझ्या पद्धतीने जगायचंय,तुझ्या किंवा दादांच्या नाही!
आईमागे मला समजून घेणारं कुणी नाही, समजलंय मला...!
तुझा सर्व वेळ मला अन् दादांना एकत्र आणण्याच्या 'भानगडीत' गेला... आमच्या दोघांतलं ते असं अंतर होतं जे आम्ही दोघांनाही 'जपलं' होतं, तुला तेच मिटवायचं होतं, अशक्याला शक्य करण्यापेक्षा पत्नीधर्म चोख पाळता यायला हवा होता तुला, तुझ्या गायकीनं मला जिंकलं होतं, ते जेतेपण सांभाळू शकली नाहीसच.
भावनिक आधार दादा कधी देऊ शकले नाहीत मला,
आणि आर्थिक दिला नाही, देऊ शकत असूनही!!
जिथेही जातोय तिथे 'किशोरीबाईंचे पती' किंवा 'सरपंचांचा मुलगा' हीच ओळख आहे! मला माझं नाव सार्थ करायचं आहे, त्यासाठी व्यवसाय उत्तम मार्ग होता, माझी ओळख मला देण्यासाठी पण दादा कधी समजू शकले का, एका मुलाचं मन? ते केवळ पती होते आणि नंतर सरपंच... आता कदाचित सासरेही... पण पिता होण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही....
तू जर माझी होऊ शकली असतीस, तर आज 'सोबतीने' घर सोडलं असतं..
असो!
प्रसिद्धी मिळवत रहा.. नाव गाजवत रहा, आदर्श सूनबाईचं बिरूद मिरव,
उद्या कुणास ठाऊक, तूच सरपंच होशील...
बंगला सोडू नकोस
झोपडीतून महालात आणलंय.... राणीसारखीच रहा..!
मला शोधू नका, त्याची 'गरज' नाही!
-राजीव
>>>>>>>>
ह्या पत्राने १६ वर्षांत लाख वेळा मला संपवलं!
पुत्रशोकाने जग सोडणार्या पित्याला म्हणे "पिता" होताच आलं नव्हतं!
पिता-पुत्राला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणारीला पत्नी मात्र होताच आलं नाही... 
राजीवच्या गरजा वेगळ्या होत्या, ते प्राप्त करण्याच्या पद्धतीही...
मी, माझं एकाकीपण, पोरकेपण, बंगल्याची-शेतीची जबाबदारी आणि उमलण्याआधी संपुष्टात आलेला संसार- जगण्यातल्या सगळ्या फटी बुजवताना,
... माझं गाणंच पुन्हा एकदा उपजिवीकेचं माध्यम झालं!
 #आसरा (अंतीम भाग)
----*----
राजीव घर सोडून गेल्यावर आणि दादांनी जग सोडल्यावर पुन्हा एकटी पडलेली मी, फार बदलले होते.
आयुष्य तटस्थपणे आणि तितकंच त्रयस्थपणे बघता यायला लागलं.
बंगल्याला "आसरा" नाव दिलं आणि येणार्या- जाणार्या वाटसरुंना 'विश्रामघर' देऊ केलं..
गावात कुणाचं दुखलं खुपलं सांगत लोक येत, मन हलकं करत नी जात... जमेल ती आर्थिक मदत करत होते.
सार्यांना हक्काचं घर मोकळं करून दिलं... माझं साध्वीपण जपत!
आणि आज,
हाच "राजीव" परत आलाय... आसर्यात आलाय... अनेक वर्षांपूर्वी बेदरकारपणे उधळून लावलेल्या संसारात परतून येण्याची भाषा करतो आहे...
नदीकाठच्या देवळाच्या पायरीवरून खाटकन उठले.. राजीवने आज सकाळी पुन्हा एक पत्र ठेवलं होतं, हातात चुरगळून गेलेलं पत्र उघडलं, हळूवार एक-एक शब्द वाचणार होते.
त्या पत्राचा अर्थ लावण्यासाठीच आज, इथे आले होते, देवळाशी... 
>>>>>>
प्रिय किशोरी,
कुठल्या नात्याने तुला आज 'प्रिय' म्हणतोय, विचारु नकोस!
तब्बल १६ वर्षांनी मी परतलोय अन् तू 'तोच' बंगला किती प्रेमाने सांभाळलास हे जाणवलं! पंचक्रोशीत आजही नाव आहे तुझं ते तुझ्या 'सेवाभावी' वृत्तीनं आणि गायकीनं...!
मला स्वीकारशीलच ह्या विश्वासाने आलोय आणि हो खूप पैसा कमावला आहे मी.... नावही!!
सारं तुझ्याचसाठी आहे! आता गाणं करत गावोगाव फिरण्याची गरज नाही तुला..
खरं तर माझ्यामागे, दादा गेल्याचं कळलं होतं मला पण आलो नाही मी, माझ्यासाठी जीव जाण्याइतपत प्रेम होतं त्यांच्या मनात, हे पटलंच नाही मला!
असो!
आपल्यापुढे उर्वरीत आयुष्य आहे, भुतकाळ विसरुन, तुझा हात हातात घेऊन जगावं म्हणतो.. गरज आहे मला साथीदाराची..
तू फक्त माझी आहेस म्हणून आजवर वाट पहात हे 'एकटीचं जीणं' जगलंस ना?
खरंच "पाण्यासारखी" आहेस तू , पवित्र, निर्मळ.. हव्या त्या रंगात ओतलं की तोच रंग घेणारी...
मी आलोय परत.. तुझा निर्णय वेगळा नसावाच... बोलूच सविस्तर!
-तुझाच, राजीव.
>>>>>>>>>>
संताप, उद्वेग, निराशा... हे सगळं दाटून आलं होतं, कालपासून, राजीवला पाहिल्यापासून, तो परत आल्याचं कारण समजल्यापासून.... 
पण आत्ता ह्या क्षणी, मनात उलथापालथ होत नव्हती.... शांत होत होतं मन.... महत्प्रयासानंतर
नकळत पत्राचे तुकडे झाले, हातातला करंडा शांत नदीत भिरकावल्या गेला...
तरंग उठले! काठापर्यंत येत गेले!
पाणी पुन्हा पूर्ववत झालं!
खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... 
खडा मारणारा मात्र निर्विकार!
------------------------------------------------------------
देवळातनं किशोरी घरी आली, तो राजीव अगदी मालकाच्या रूबाबात सोफ्यावर बसलेला..
तिला पाहताच खुशीने समोर आला, तिने पत्र वाचलेच असणार आणि आता सहजीवनाची सुरूवात करण्यासाठी तिची हरकत नसावीच असे गृहीत धरूनच. तिचे असे स्वतःचे मत लक्षात घेण्याची त्याची गरज कधीच नव्हती.
हसत- उठून म्हणाला, "अगं होतीस कुठे? किती वेळ झालाय तुला जाऊन? आणि काय, आज शिरा वगैरे होता.. अजूनही माझी आवड लक्षात आहे तर, पण आता मी गोड खात नाही. साखर झाली आहे मला.. ते सोड, पत्र वाचलंच असशील.. मग तुझा विचार माझ्यापेक्षा काहे वेग...."
तिला त्याच्या संवादात कणाचंही स्वारस्य नव्हतं, त्याच्या बाजूने तडक निघून ती वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली तसा हा बावरला...
तिने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला नव्हता... त्याच्यासाठी हा धक्का होता.
दिवसभर किशोरीने तिच्या खोलीत रहाणंच पसंत केलं आणि तिच्या परवानगीशिवाय तिच्या खोलीत कुणालीही न येऊ देण्याची सोयही केली.
आज तिचा तानपुराही म्लान होता.
बागेच्या दिशेने उघडणार्या खिडकीत ती जाऊन उभी राहिली.... काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असले की तिच्याही नकळत ती तिथे उभी असायची. 
तिने मायेने जपलेली ही बाग, तो बंगला "आसरा", गावातली लोकं, त्यांचा विश्वास...
हे सगळं करताना तिने तिच्या वैयक्तीक आयुष्याला फारसं महत्त्व दिलंच नव्हतं....
खरं तर- महत्त्व देण्याचा तिने केलेला प्रत्येक प्रयत्न नियतीने हाणून पाडला होता.
आज तिला तिचा "निर्णय" विचारण्यात आला होता... किंबहूना तो निर्णय विचारण्याचा निव्वळ औपचारिकपणा होता, निर्णय गृहीत धरण्यात आला होता.
लहाणपणी आई वडील गेले- ती अज्ञान होती
कजाग काकूच्या हवाले बालपण झालं- तिचा नाईलाज होता
अचानक लग्न ठरवायला कुणी दारात आलं-  परिस्थीतीला प्राप्त निर्णय घेण्यात आला
राजीव घर सोडून गेला, दादा जग सोडून- तिचा दोष इतकाच की दोघांत समेट घडण्याचे तिने प्रयत्न केले..
आता राजीव परत आला आहे... जसा एकाएकी निघून गेला होता, तिच अस्तित्व नाकारून, तसाच एकाएकी परत आला आहे, तिचं अस्तित्व गृहीत धरून.
राजीव!!!!
त्याला त्याच्या आवडीचा शिरा करून खाऊ घातला होता अगदी आज सकाळीच, कुठेतरी मनात कसलासा मोह, आस तग धरू देण्याआधीच निर्णय घ्यायचा होता तिला....
.. भावनांना ओल न येऊ देण्याचा निर्णय... 
तिचं मन विचारांचा गर्तेत गोल फिरू लागलं, सगळा ऊहापोह अखंड सुरू होता...
राजीव!!
त्यानं लग्न केलं होतं- दादांना तोंडघशी पाडण्याचा एक प्रयत्न म्हणून-  त्याच्या स्वाभिमानाचा विजय हीच तेव्हा त्याची 'गरज' होती
तो घर सोडून पळून गेला- त्याला स्वतःचा व्यवसाय हवा होता- त्याची ओळख प्रस्थापित करणेच त्याची 'गरज' होती
तो परत आला आहे- वय कलतं झाल्यावर, एकलेपणाची जाणीव तीव्र झाल्यावर- कारण आता,  सहजीवन, स्थैर्य- त्याची 'गरज' आहे...
ती लग्न करून ह्या घरात आली तेव्हा- एक शांतपूर्ण जीवन, हरवलेली नाती जगण्याचा आनंद मिळवणं, सुखी संसार करणं ह्या काही तिच्याही गरजा होत्या, ज्या उधळल्या गेल्या, कधी परिस्थीतीकडून, कधी नात्यांतल्या तणावाकडून, कधी नियतीकडून तर कधी राजीव सारख्या माणसाकडून... 
तिच्या असण्या नसण्याने फरक पडणारच नव्हता. 
तिने, जगण्याची १६ वर्षे निर्लेपपणे सेवा केली, दुखणाकरूंची, वाटसरूंची... एक दमडीही न घेता, याउलट तिच्या गाण्यांतून जमा होणारा पैसा "आसर्याला" अर्थ देण्यासाठी देऊ केला
पण,
काही जीवनं पोकळच असतात. तसंच तिचं होतं... 
पाण्याचा प्रवाह आला, तिला वाहत घेऊन गेला, कुठल्याही दिशेने, केव्हाही, कधीही... मग त्या जगण्याला आता संसाराची आसक्ती नाही उरली... ह्या बंगल्यावर तरी काय हक्क? जन्मतानाच अनाथ झालेली आजन्म कुणा ना कुणाच छप्पर शोधत असलेली... आसरा लोकांना देऊ केला? नाही. तिने तो स्वतःसाठीच शोधू केला... 
कधी नातेवाईकांना आसरा मागितला, तर कधी नात्यांना...
पण, ते स्थैर्य मिळवण्यासाठी आता लाचारी स्वीकारण्याची इच्छाच मेलेली आहे...
नि:स्वार्थ सेवा केली येणार्या जाणार्यांची..
आता कशाचा स्वार्थ नको...
नात्यांचा नको
भावनांचा नको
संसाराचा नको....
आता प्रवाहाच्या दिशेने जायचं नव्हतं, आता प्रवाह होण्याची वेळ आली होती.
निर्णय झाला होता.
--------------------------
रात्री सगळीकडे नीज झाल्यावर एका हातात, एक लहानगी पेटी घेऊन ती उतरली... एक अंगावरली साडी आणि एक त्या पेटीतली.... आणि ......दुसर्या हातात तानपुरा..!!
अलगद 'आसर्या' बाहेर पडली
इथली तिची 'गरज' संपली होती!
ह्या घराचा 'मालक' परत आला होता....!
स्वतःला हवं तसं जगणं हीच त्याची 'गरज' होती..
आणि आता
...... तिचीही !!!
क्षणभरच रेंगाळली... दादांनी लावलेल्या गुलाबाच्या, जाई-जुईच्या फुलांचा गंध उरात साठवला...
पाय अडखळले ते 'माळी-काकां' साठी...
बंगल्यामागच्या त्यांच्या झोपडीत जाऊन आशीर्वाद घ्यावा का?
म्हणतील, "किशुरी, माजी बाय, जा गं तू ह्या बंगलेतून... जळू नगंस हिथ... सूखी र्हा माय..."
पण, कुठल्याही मोहात न पडता पाऊलं झपाझप निघाले....
उगवणारा सूर्यच ठरवणार होता....
तिचा मार्ग, जगण्याचा!!!
--------------------
(समाप्त)
-बागेश्री


Post a Comment

2 Comments

  1. उगवणारा सूर्यच ठरवणार होता....
    तिचा मार्ग, जगण्याचा !!!
    अ.प्र.ति.म !

    ReplyDelete
  2. कथा संपेपर्यंत मी वाचणे थांबवूच शकले नाही.अप्रतिम

    ReplyDelete