राधे...

राधे,
मी समजू शकते तुझी अवस्था
मन कान्ह्याला सुपूर्द करून
शारीराने संसार करण्याची तुझी अपरिहार्यता,
कळते मला...
यमुनेशी सांज कलताना
एकाएकी अनयाची बोटे तुझ्या हातात गुंफताच
अवघडून उभी होतेस तेव्हा
तुझ्या मनातला कल्लोळ
यमुनेच्या तरंगावरून
ह्या काठापासून त्या काठापर्यंत
रिकामासा हिंदकळत राहतो...
तुझ्या घामेजल्या तळहाताला
वैजयंतीचा गंध येण्याचं कारण आणि
सारं काही ओठाआड लपवण्याची तारांबळ
कळते मला...
त्याच्या संसारातलं प्रत्येक कर्तव्य
मूकपणे पूर्ण करत असताना
मनात चाललेल्या अखंड जपाला
न्याय देत राहतेस
तेव्हा पटू लागते तुझी थोरवी
तुझ्या तनापासून मनाला
स्पष्ट वेगळं करुन
जगत जाण्याची हातोटी
तूच मिळवू जाणे
पण
केवळ एका बासरीला भूलून
कान्ह्याला गोकुळाबाहेर जाऊ देण्याचा, 
अलिखित तुझा करार
आजही कळून येतच नाही मला,
तुझी कित्येक पारायणे करूनही......

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. अग कित्ती गं सुरेख गुंफतेस भावनांना शब्दात ... कुठून ही हुकूमत आली ...
    रांगोळीप्रमाणे रेखीव अन् रंगीत...
    हेवा वाटणे बरोबर नाही...पण नाइलाज आहे वाटतोय खरा....��

    ReplyDelete