Monday, 8 February 2016

'मी'

.....शेवटी तो एकटाच बोलू लागला.
"मी काय काय केलं, किती सहन केलंय, माझं हे, माझं ते, उगाच मोठा झालो नाही "मी" मी? मीsss.. मी!!!!!"
हळू हळू खोलीत, घराच्या प्रत्येक कोपर्‍यात फक्त"मी" उरला. त्या सगळ्यांची एकी झाली, "मी" ची एक मोठ्ठी सावली झाली. उंच उंच होत गेली. उभी- आडवी पसरत गेली. खोलीमधला प्रकाश गिळला. डोक्यावरचं छप्पर फाडलं. तिचा मात्र डोळा लागला होता. 
एकाएकी सर्वत्र अंधार झाला तसा, लेक भातुकली सोडून चाचपडत आली... आई झोपली आहे कळता बापाकडे मोर्चा वळवला.. त्याच्या मांडीवर बसत "लाइत केव्वा येनाल बाबा, मला अंधालात बिती वात्ते" म्हणाली.
बापाने तिला कुशीत घेतलं. गोंजारलं. सावली लहानगी होत होत त्याच्यामधे विरून गेली....

निरागसतेसमोर 'मी'पणा कधी टिकलाय?


-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...