Tuesday, 22 March 2016

विश्वचक्र

कुठल्याशा एका क्षणाला
एक प्रहर अवेळीच गळून गेला
जीवनाचं झाड बहरून आलेलं
त्याने फारशी दखल घेतली नाही
अवेळी जाणार्‍याच्या
खुणा जास्त सलतात
झाड मग्न होतं
फांदी सजग होती
गळून गेल्या प्रहराजागी
नवा प्रहर आलाच नाही
फांदीनं नसलेपण जपलं
उरलेल्यांशी जुळवून घेतलं
झाड मग्न होतं
फुलत होतं
बहरत होतं
थव्यांनी मोहरत होतं
पावसानं शहारत होतं
आताशा फांदी त्याच्यात रमत नव्हती
त्याच्यासवे शहारत नव्हती
पण कधी कोण्या क्षणी
तिने त्याचं
घुसमटणं पाहिलं
बसल्याजागी धुमसणं पाहिलं
मुळासकट गदगदणं पाहिलं
वर वर जे मग्न आहे
आत आत ते भग्न आहे
प्रत्येक प्रहराचा हिशोब मात्र
पाना फुला सावलीत आहे
अनेक फांद्या अनेक प्रहरे
येतात आणि गळून जातात
काळ वेळ जन्म मृत्यू
चक्रामध्ये फिरत राहतात
सारे काही दिसते त्याला
सांगता मात्र येत नाही
निसटत जाते हातचे जरी
थांबता कोठे येत नाही
कधीकाळी घेतला त्याने
जगण्याचा जो एक वसा
उमटवत जातो जन्मावरती
अस्तित्वाचा गूढ ठसा

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...