शिक्का

ह्या जगात
एकाच गोष्टीमुळे घडणा-या घटनेचे भिन्न प्रतलांवर टोकाचे पडसाद उमटलेले दिसत अस्तात.
तुम्ही कोण, कसे आणि कुठे आहात त्यानुसार भावनांचा अनुभव निराळा. तीव्रता निराळी. त्याचे आयामही निराळे.
चांगलं कुठलं, काय वाईट हा प्रश्न नाही. जो जे अनुभवतो आहे, ते अनुभवतो आहे. त्याला टॅग नको करायला.
आपण जगता जगता अनेक परिमाणं मिळवत जातो. इथे तिथे योजित जातो. नितळ जगणं, किंबहुना 'जगणं' हेच मागे सुटलंय. उरले आहेत जजमेंट्स! दिसला माणूस की त्याच्याबद्दलची मतं तयार होण्यास सुरुवात होते. आपल्या चष्म्यातून बघत जाऊन त्याच्यावर 'हा असा, अमूक तमूक' शिक्का मारुन आपण मोकळे होतो. खरं तर केवढं अफाट हे विश्व. त्याचा पसारा किती मोठा, आपलं अनुभवविश्व ते काय? कोण आपण जे इवल्याश्या चष्म्यातून अख्खा माणूस जोखून त्याच्यावर कसलासा शिक्का मारून "मी ओळखतो त्याला/तिला" म्हणून मोकळे होतो. कसं ओळखू शकतो आपण एखाद्याला!
        प्रत्येक व्यक्ती, जिथे उभा आहे तिथे तो परिस्थितीच्या लाखो- करोडो तंतूनी जोडला गेला आहे, तेव्हा एखाद्याच्या क्षणिक वक्तव्यावरून, व्यक्त होण्याच्या पद्धतीवरून त्याला आपण "ओळखू" वगैरे लागणे ही गोष्ट आश्चर्याची आहे. आपण स्वतःला किती "जाणून" आहोत, ह्याचं उत्तर जवळ नसताना, इतरांवर शिक्के मारण्याचा खेळ वेळखाऊ आहे.
         आपण स्वतःच्या आत बुडीच मारु शकत नाही, हे वास्तव आहे. आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या आणि आपल्या अस्तित्वाच्या डोहामधे एक चकचकीत पारदर्शक काच आहे,  "इगो"ची. ती आहे पण दिसत नाही. तिला ओळखून, तोडून स्वतःच्या डोहात बुडी मारून त्याचा तळ ढवळून काढता येत नाही तोवर जगणं हे परिमाणांचं गणित होऊन राहील हे खरं.
             खरे तर आपण आणि तो डोह, जोवर एकरूप होत नाही तोवर आपल्याला इतरांवर काय्, स्वतःवरही "मी कोण?" ह्या उत्तराचा शिक्का मारता येणं शक्य नाही.
डहूळला डोह आपल्याला सामावून शांत होईल तेव्हा त्याचा नितळ तळ दिसू लागेल. तेव्हा कुठे स्वच्छ नजरेने पाहता येईल समोरचा प्रत्येक माणूस आणि त्याचं आहे तसं असणं.... शिक्काविरहीत!
-बागेश्री



Post a Comment

2 Comments

  1. बगीश्री, तू म्हणतेस त्याप्रमाणे, कृष्णाचं व्यक्तिमत्व म्हणजे एक-एक सोपान आहे...त्याला समजून घेण्यापेक्षा त्याला अनुभवण्याच...तसं स्वत:ची ओळख करून घेणे, ही सुद्धा एक प्रक्रिया आहे...तिचे सोपान आहेत...ध्यान,धारणा आणि समाधी...हे सोपान म्हणजे आपल्या अंत:करणात उतरण्याच्या अवस्था आहेत.तिथूनच एकदा आपली स्वत:ची ओळख लागायला लागली की सर्व जगाची,प्राणीमात्रांसह माणसांची ओळख लागू लागते. दुस-या जाणून घेण्यासाठी पहिली स्वत:ची ओळख व्हावी लागते...तेव्हा मग आपलं मन म्हणजे एक आरसा होतो...ह्या आरश्यात स्वत:सह सर्वांची ओळख स्पष्ट नितळ.... जाणीवेच्या पातळीवर होऊ लागते.पण त्यासाठी अनेक सोपान पार करत नव्हे तर घडवत जावं लागत...हा एक आपलाच पुनर्जन्म असतो...तुझ्या सोपान ह्या कवितेतून,गद्य चिंतनातून, टप्प्या-टप्प्यातून तुला उलगडत आहे...त्याचे भाव विभोर प्रतिबिंब तुझ्या साहित्य निर्मितीत दिसू लागलं आहे...त्यात मलाही डोकावता यायला लागलं आहे...हे तुझ्या निर्मितीचे रहस्य आहेच शिवाय सुफळ भाग्य आहे.

    ReplyDelete