Monday, 7 March 2016

महत्वाकांक्षा


तुझ्या प्रत्येक महत्त्वाकांक्षेची वाट
जिथे जाऊन संपते
तिथे एक भला मोठा दगड आहे.
अतिप्रचंड मोठा दगड
जो तुझ्या इवल्या हाताने दूर लोटता येण्यासारखा नाही
आणि मागची वाट विरलेली असेल
डोक्यावरती मोठ्ठं रिकामं आकाश
समोर दगड
आणि मागे अंधार असा उभा असशील तेव्हा
तू निराश होणार नाहीसच
कारण
ज्या ध्यासापोटी तू तिथवर जाणार आहेस
तो तुला गप्प बसू कसा देईल
तुझा दगडाशी निष्प्रभ संघर्ष सुरू होईल
आणि हळू हळू
तुझ्याही नकळत
तू काडी काडी जमवून
शेजारी निवारा उभा करु लागशील
राना वनातलं अन्न
आणि निसर्गाची साथ
तुला तुझ्या आजवरच्या
धावण्यातला निष्फळपणा
दाखवून देईल
तेव्हा
तुझ्यासारख्या तिथवर पोहोचलेल्या
सगळ्यांचाच
तू आसरा होशील
तुझ्या घराबाहेरचा
लख्ख कंदील
होईल पाठीराखा
कित्येकांचा..
सारे मिळून
कधीतरी तो पत्थर
दूर कराल तेव्हा
दिसेल लांबलचक
स्वच्छ निरपेक्ष वाट
ज्यावर मानवी पाऊल
अजून पडलंच नाही आहे
त्या वाटेची भूरळ
पडून सारे चालू लागतील तेव्हा
महत्त्वाकांक्षेचा विसर पडून
निव्वळ कुतूहल असेल 
प्रत्येकाच्या डोळ्यात
तू आणि तुझा निवारा
मात्र तिथेच
उभे असाल
मागून येऊ पाहणार्‍या
आणखी अनेकांना
"जीवनात" नेऊन सोडण्यासाठी

-बागेश्री
Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...