महत्वाकांक्षा


तुझ्या प्रत्येक महत्त्वाकांक्षेची वाट
जिथे जाऊन संपते
तिथे एक भला मोठा दगड आहे.
अतिप्रचंड मोठा दगड
जो तुझ्या इवल्या हाताने दूर लोटता येण्यासारखा नाही
आणि मागची वाट विरलेली असेल
डोक्यावरती मोठ्ठं रिकामं आकाश
समोर दगड
आणि मागे अंधार असा उभा असशील तेव्हा
तू निराश होणार नाहीसच
कारण
ज्या ध्यासापोटी तू तिथवर जाणार आहेस
तो तुला गप्प बसू कसा देईल
तुझा दगडाशी निष्प्रभ संघर्ष सुरू होईल
आणि हळू हळू
तुझ्याही नकळत
तू काडी काडी जमवून
शेजारी निवारा उभा करु लागशील
राना वनातलं अन्न
आणि निसर्गाची साथ
तुला तुझ्या आजवरच्या
धावण्यातला निष्फळपणा
दाखवून देईल
तेव्हा
तुझ्यासारख्या तिथवर पोहोचलेल्या
सगळ्यांचाच
तू आसरा होशील
तुझ्या घराबाहेरचा
लख्ख कंदील
होईल पाठीराखा
कित्येकांचा..
सारे मिळून
कधीतरी तो पत्थर
दूर कराल तेव्हा
दिसेल लांबलचक
स्वच्छ निरपेक्ष वाट
ज्यावर मानवी पाऊल
अजून पडलंच नाही आहे
त्या वाटेची भूरळ
पडून सारे चालू लागतील तेव्हा
महत्त्वाकांक्षेचा विसर पडून
निव्वळ कुतूहल असेल 
प्रत्येकाच्या डोळ्यात
तू आणि तुझा निवारा
मात्र तिथेच
उभे असाल
मागून येऊ पाहणार्‍या
आणखी अनेकांना
"जीवनात" नेऊन सोडण्यासाठी

-बागेश्री




Post a Comment

1 Comments

  1. जिथे वाट पुढची वाट अडलेली असते...एकल शक्तीच्या सबलतेला..परतीची वाट कापलेली असते....तिथे महत्वाकांक्षा सोड, बागेश्री..आकांक्षांच विरून जाते...कारण तिथे विजगिषु मानवी प्रयत्नांची, महत प्रयासांची,कठोर निष्ठांच्या समईची शांत ज्योत...लक्ख कंदील होत असते....मागून येणा-या जनसामान्यांना ....त्याच्या जीवन प्रकाशात उजळून निघणारा असतो उज्वल भविष्य काळ....बागेश्री, हे माणसाचे महन्मंगल स्त्रोत्र आहे...तुझ्या लेखणीतून असेच भाषांतरित होऊ दे...

    ReplyDelete