Saturday, 16 April 2016

आत्मरस

मला माहितीय
ती बसली असेल
नैराश्याची शाल ओढून
नजर जमिनीत खोल गाडून
मनात उठणा-या लक्ष लाटांना
संयमाचा किनारा देत
स्तब्ध
आत्ममग्न....

मला माहितीय
कुणी हाक मारल्यावर
तीच नजर ती वर करेल
समोरचा तिची सैरभैर अवस्था
टिपूही शकणार नाही
इतक्या झर्रकन ती बदलेल भाव
आणि मारेल संसारात बुडी
खोल
आत्मरत....

मला माहितीय
ती आत आत शोधते आहे मला
मी मात्र पोहोचतच नाही
तिच्यापर्यंत
पण,
तिचीच बेचैनी
अंगभर ओढून इथे
एकल वावरत असतो
हे कळून येईल तेव्हा
टपटपेल तिच्याच डोळ्यातून
उष्ण
आत्मरस...

-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...