Thursday, 14 April 2016

काल तुजी चिमनी निजलीच न्हाई

तू गेलीस न् पणतीत वात तशीच -हायली...
तुळशीतल्या मातीला ओल तशीच -हायली
चुलीतल्या लाकडाची धग बुजलीच नाही
काल तुजी चिमनी,
निजलीच न्हाई..
सारवलं होतंस काल आंगन रेखीव
काढली होतीस रांगोळी आखीव
आज सडा सारवन झालीच न्हाई
घराला जाग काई आलीच न्हाई
घेतलं होतंस काल लेकरु थानाला
भाकर दिलीस भागल्या जीवांला
चिमनी चोच आज भिजलीच न्हाई
लागली भूक पन इझलीच न्हाई
चोचीने मांडलाय आकांत घरभर
सावरायला तिला तरी ये तू पळभर
हाकही जाईना दूर गेलीस अशी
कळंना ही झाली पडझड कशी
हातावरली मेंदी तुज्या रंगलीच न्हाई
काल तुजी चिमनी ,
निजलीच न्हाई....
                  बागेश्री

3 comments:

  1. ही आणखी एक कविता....जिथे बागेश्रीची दोन रूपे दिसतात, एकमेकांत मिसळलेली....एक धरित्री माता आणि मानवी मायमाऊली....आषाढातील ग्रीष्म...तप्त धरित्री आणि हैराण निसर्ग पालवी....निसर्गाच्या अंगप्रत्यगावर वर्षा ऋतूने "सारवल होतस काल आंगन रेखीव...."पण हा हा म्हणता सरला शरद, हेमंत आणि शिशिर...अन धरित्रीच्या निसर्ग लेकु-याची "लागली भूक पन इझलीच न्हाई"....दुष्काळाने आकांत मांडला आहे... मराठवाडा-विदर्भ ह्या लेकरांच्या "चोचीने मांडलाय एकांत घरभर".बागेश्रीची माय मग म्हणते आहे-"हाकही जाईना..." महाराष्ट्राच्या कानाकोप-यात..."दूर गेलीस अशी, कळना ही झाली पडझड कशी"... जल व्यवस्थापन शास्त्र ज्यांनी सांभाळायचं त्या शासनकर्त्यांनी पडझड कशी झाली,हे समजून घेण्यासाठी आता नेमल्या आहेत, चौकशी समित्या...अन आत्महत्या होत राहिल्या आहेत..."काल तुजी चिमनी, निजलीच न्हाई."...पणतीतली वात विझत नाहीयेय, शेतक-याच्या घरातला १३ वा दिवस संपतच नाहीयेय... विलक्षण सुन्न करणारी ही संवेदना आहे.बागेश्री,तुझ्या संवेदन सामर्थ्याची आणि ती शब्दरूप करण्याच्या तुझ्या क्षमतेची धन्य आहे....

    ReplyDelete
  2. कसलं भारी लिहिलंयtouching

    ReplyDelete
  3. kaakaa, me marathvadyatalich. Mul gaaon Nanded

    ReplyDelete

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...