कन्फेशन... An everlasting monologue!

..... मी कधीच पर्वा करत नाही, कशाचीच कारण मी कधी ओझं होत नाही, कुणावरच.
म्हणूनच आज हे कन्फेशन. हे केलं नाही तर आत्म्यावर विचारांचं ओझं राहून जाईल, ते टाळायचंय.
तुला मी अट घालून ठेवलीय, की तू मधे काहीच बोलणार नाहीस, प्रश्न विचारणार नाहीस. मी नजरेत नजर मिसळवून बोलेन, डोळे भरून आले, तर तू पुसणारही नाहीस. अट आहे, लक्षात ठेव.
मी तुझ्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी गुंतलो. रुतलो. बर्बाद होईपर्यंत पुढे गेलो.
रुप आणि बुद्धी एकत्र आले की माझा बळी ठरलेला. पण माझ्या आयुष्याचा मी एकमेव मालक होतो. कुठे, किती वाहवत जायचं, कुठे थांबायचं, मी ठरवत गेलो.
सगळ्या मर्यादा ओलांडल्या. छे! मर्यादा मंजूरच नव्हत्या मला!
मी स्वतंत्र जीव होतो. बेफाम वागत गेलो. अनेकदा हिशोब चुकले. ओरबाडला गेलो. एकटा पडलो... तेव्हा तेव्हा तुझ्याकडे परतून आलो. तू कायम आहे तिथे उभी. दारात तुळस घरात तू, हे चुकलं नाही. ह्याचीच प्रचंड चीड यायची. मी अवलिया, बेफिकीर. तू घराचा बळकट वासा, मग तुझ्या चारित्र्यावर रेघोट्या ओढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पुरावे जमवून पाहिले. प्रत्येक वेळी पावित्र्याचं सर्टिफिकेट तुला द्यावं लागायचं. मला गिल्टी भावना आवडत नाही, तुझ्या सानिध्यात ती भावना माझी बेफिकीरी न जुमानता माझ्या आत शिरायची. ह्या सगळ्यामुळे ताण वाढायचा. दोन व्यक्ती सारख्या असतील तर निदान गिल्ट येत नाही. एक अथांग असेल तर दुसरा मात्र खुजा होऊन जातो. मला हे खुजेपण बोचत गेलंय तुझ्या सान्निध्यात.
            मग, तुझ्याबद्दलचा तिरस्कार मी मुद्दाम वाढवत गेलो. माणसाला कारणं हवी असतात, स्वतःच्या वागण्याला दुजोरा देण्यासाठी. मला अनेक मिळाली. अजून बेपर्वा होत गेलो. रंग रूप हुशारी प्रतिभा ह्या भुकांसकट शारिरीक गरजा बाहेरच भागवत गेलो. कपाळमोक्ष झाला की मग मात्र तू आणि तुळस! माझं तात्पुरतं "तुझं असणं" तू कसं पचवायचीस? कसं साधलं तुला, मी आलो की मला स्वीकारणं आणि गेलो की माझी वाट पाहत राहणं?
               घराचा वासा बळकट असेल तर छप्पर आगळिक करायला मोकळं असतं.. आपल्याबाबतीत तेच झालं.
कुठल्याही गोष्टीची परिसीमा झाली, की त्यातला फोलपणा कळतो. मला माझ्या भुकांनी ह्या निरर्थकतेला आणून पोहोचवलं.
इतरांकडे जाऊन सुख ओरबाडून घरी यायचं, तुला दूर लोटायचं. त्या दूर लोटण्यातूनही सुखच मिळवायचं!
बाहेर कुणी झिडकारलं की त्याची वसूली तुला ओरबाडून करायची!! शिसारी आली.
कधीतरी ह्या सार्‍याचीच शिसारी आली. इतकी की, कुणाकडे आक्रूष्ट होणं किंवा फॉलबॅक म्हणून तुझ्याकडे परतणं, हे दोन्ही बंद झालं. तेही नको, तूही नकोच अशी अवस्था.
आता एक मोठा शुन्य आहे, मी त्यात एकटा आहे. ए क टा. स्वतंत्र? बेफिकीर? नाही खुजा!
दारुचं व्यसनच संपवतं माणसाला? माणसाच्या गरजांचं व्यसन जास्त घातक. मी असा शुन्यात बसतो आणि तू येतेस, माझ्या केसांतून हात फिरवतेस, मला झटकून टाकावा वाटतो तुझा हात. मला मी केविलवाणा वाटतो त्याच्यामुळे. माझ्या डोळ्यांतून माझ्या आत्म्यावरची गिल्ट वाहून का जात नाही एकदाची?
मीच तो. कधी कुणाच्या कणभर उपकाराचं ओझं न बाळगणारा. आज तूझ्या अथांगतेचं ओझं झालंय माझ्यावर. मला माझ्या खुजेपणात संपून जाऊ दे.
                तू म्हणशील, हे सारं तुला माहिती आहे. हे कन्फेशन वगैरे कशासाठी?
मी संपतोय. रोज थोडा थोडा. वेळेच्या आधीच. मला सोडून जाशील?? जा. खरंच जा. जाताना तुझी अथांगता घेऊन जा.
शुन्यात जिरताना स्वतःला केविलवाणं बघण्याची हिम्मत माझ्याकडे नाही.
-बागेश्री

Post a Comment

1 Comments