राधा कृष्ण

... आणि एके दिवशी कान्हा गोकूळ सोडून निघाला, मथूरेकडे!
तिथून द्वारका, पांडवांचं इंद्रप्रस्थ... आणि खूप काही.
त्याचा प्रवास संपला नाही.
त्याने वळून पाहिलं नाही.
गोकूळात आपली "बालकृष्ण, कान्हा" म्हणून उमटवलेली प्रतिमा, मुद्दाम कधी पुसली नाही.
गोकुळातल्या कान्ह्यावर श्रीक्रुष्णाची छाया म्हणून पडू दिली नाही.

राधा आणि त्याची लाडकी बहिण एकनंगा गोकूळाबाहेरपर्यंत आले होते, त्याला निरोप देण्यासाठी
तिच्या घामेजल्या तळव्याचा तो स्पर्श, शेवटचा.
निरोपाची नजरानजर, शेवटची.

मग अखंड प्रवास सुरू झाला.

प्रवास, जनपदाचा! 
कायम एक अघोषित महाराज म्हणून, द्वारकाधीश म्हणून, सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मंगळसुत्रातला मणी म्हणून, रुक्मिणीचा पती म्हणून, रुक्मिणीने सख्या मानलेल्या सात सवतींचाही पती म्हणून, द्रौपदीचा सखा म्हणून, राजकारणी धुरंधर म्हणून.... सुदर्शनधारी युगंधर म्हणून हा वासुदेव चालत राहिला.
त्याचा आवाका, जिवीतकार्य गोकूळात राहून साधणारं नव्हतंच
राधेचा होवून त्याला थांबता येणार नव्हतं.

तिलाही अनयाकडे रहावं लागणार होतं.
समाजाच्या नियमानूसार कर्तव्यपूर्तीच करावी लागणार होती.
कशी जगली असेल ती?
तिचं मन तिच्याकडे नसताना?

त्यानेही तिची नाजूक भेट, वैजयंतीमाला आजन्म गळ्यात वागवली.
अंगठ्यात निर्वाणीची बाण रूतला
तेव्हाही ती गळ्यात होतीच....

त्याच्या राधेची भेट ती.

काही नाती चौकटीतली नसतात. हेच खरं.

-बागेश्री

Post a Comment

4 Comments

  1. कृष्ण नात्यात गवसणार व्यक्तित्व नव्हत....हे एक विभूती तत्व होत,अवतारित झालेलं...राधेला ते भावलं, पण कृष्णाच्या विभूतीमत्वात कायमच रुतून गेलं...आणि युगानुयुगे ते मानवतेला कधी मीरा, कधी कान्होपात्रा, कधी बहिणाबाई तर ....आता बागेश्रीच्या रुपात आपले दिव्यत्व काव्य, कला, साहित्य अंगाने आविष्कृत करीत आहे....

    ReplyDelete
  2. कधी मीरा, कधी कान्होपात्रा, कधी बहिणाबाई तर ....आता बागेश्रीच्या रुपात आपले दिव्यत्व काव्य, कला, साहित्य अंगाने आविष्कृत करीत आहे....>>>
    काका, तुम्ही घेतेलेली नावं फार मोठी. त्यांच्या पंगतीला बसण्याइतकी मी कुठल्याच अर्थाने समर्थ नाही.

    ReplyDelete
  3. बागेश्री,इथे ह्या पंगतीत बसायला....एकच अट आहे...कृष्णाची अनुभूती आणि ती शब्दरूप करणे....आणि ती आमच्या सारख्या रसिकांच्या हृदयाला भिडविणे. एक दिव्यत्व आहे तुझे...त्याला तिथे त्या पंगतीत बसविले आहे...तुला नाही बर का!

    ReplyDelete
  4. बापरे
    मी ऐकते तुमचं, उत्तर काही सुचत नाही

    ReplyDelete