Tuesday, 31 May 2016

नजर

वास्तवाने खळखळून डोळे धुवून निघाले, त्या प्रत्येक क्षणाची मी ऋणी आहे.
त्या प्रत्येक क्षणाने मला माझ्यापासून वेगळं केलंय
आणि परिस्थितीचं कडकडीत भान आणून दिलंय.
त्या स्पष्ट दृष्टीनेच स्वत:लाही तेव्हा आरपार पाहता आलंय, कधी घॄणा, कधी कीव तर कधी आनंदही झालाय.
आनंद झालेले क्षण वगळले तर उरलेल्यांचा हिशोब लावण्यात पुढचे काही दिवसही गेलेले आहेत.
पुढच्या वेळी जेव्हा ही नजर स्वच्छ होईल, त्या क्षणी जुन्या घटनांचं, पुनरावृत्तीचं सावट नसावं, अशी स्वतःसाठी सदिच्छाही बाळगली आहे.
अशा दैवी क्षणांची वाट बघण्यात अर्थ नसतो.
ते धाडकन येऊन भेटतात. त्यांना वेळ काळ प्रयोजन नसतं.
कुठल्या अंधार्‍या वळणावर भेटतील किंवा बाल्कनीतल्या उन्हात चकाकतील.
गुलमोहराकडे टक लावून बघत असताना झोळीत उतरून येतील नाहीतर शांत निजताना पापण्यांच्या आड चमकतील.
ते आले की फक्त स्वीकार करायचा.
नजर स्वच्छ करून घ्यायची.

काही काळ मुखवट्यांच्या आरपार बघण्याची ती योजना असते... इतरांच्याही, स्वतःच्याही.


-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...