Thursday, 5 May 2016

धागा

स्वतःत उतरून जायला एक धागा हवा असतो. तो कधीही, कुठेही, कोणत्याही रूपात मिळू शकतो. कधी एखाद्या गाण्याच्या स्वरूपात, कधी पुस्तकातल्या दोन ओळींच्या स्वरूपात. तो धागा मिळाला की मग मात्र स्वतःत उतरायचंच. संधी हुकवायची नाही. बाहेरचं सगळं जग बंद करून आत रमायचं. वास्तव जगात तरुन जाण्यासाठी अनेक पातळ्यांवर सतत करव्या लागणा-या तडजोडींमुळे आत फार नुकसान तर झालेलं नाही ना, ह्याचा लेखाजोखा घ्यायचा. नुकसान झालेल्या जागा आपल्याच स्पर्शाने फुलवायच्या.
तुम्ही फार वेळ असे रमलात की बाहेरून हाका येऊ लागतील, करायचं दुर्लक्ष! पुन्हा तेच गाणं रिवाईन्डला टाकायचं, पुस्तकातल्या त्याच दोन ओळी वाचून काढायच्या..!!
आपल्याला लागणारी अनेक नाती जपत असतो आपण, स्वतःशी असलेल्या नात्याचं काय! असं कधीतरी खतपाणी घालायचं...
स्वतःत उतरून जाणारा धागा मिळाला की दुस-या टोकाशी असं नक्की उतरा, ती हक्काची जागा आहे, अधून मधून भेट द्यायलाच हवी!
-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...