लोकमान्य टिळक


१ ऑगस्ट म्हटलं की नकळत लोकमान्य टिळक आठवतात.
शाळा, कॉलेजमधे त्यांच्यावर केलेली अनेक भाषणं आणि जिंकलेल्या वक्तृत्व स्पर्धा आठवतात.
त्यांचे चिखलातले कमळ असणे आणि शेंगांचे उदाहरण असलेले इतर मुलांचे टिपीकल भाषण आठवतं. बाबांनी माझ्या भाषणात राखलेला वेगळेपणा आणि त्यामुळेच वाजणारं वक्तृत्व आठवतं
बाबांनी दरवर्षी लिहून द्यायचं आणि मी खडखडीत आवाजात ते अनेक श्रोत्यांसमोर सादर करायचं, आमच्या दोघांतली गट्टी आठवते. भाषणात मी ओतलेला जीव आणि शाळांच्या स्पर्धांमधून झालेलं राजकारणही आठवतं. दमदार भाषण देऊन बाईंच्या मुलीचा पहिला नंबर, माझा दुसरा म्हणून हिरमुसणं आणि घरी आल्यावर आईने घातलेली समजूत आठवते.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"
त्वेषात हे वाक्य उद्गारताना जणू आपणच क्रांतिकारक आहोत आणि मंडालयाच्या तुरुंगाची आपल्याला भिती ती काय? असा स्वतःचा अवतार. स्वातंत्र मिळून ३७ वर्षे झाल्यानंतर जन्माला आलेल्या पिढीतले आम्ही. लोकमान्यांशी एकरूप होताना स्वातंत्र्याची माझी स्वतःची व्याख्या नकळत साकारत गेली. त्यांचा बाणेदार, सच्चा स्वभाव कुठेतरी आत मुरला. अन्यायाविरुद्धची चीड स्वभावात आली. खरे तर त्यांची मते जहाल होती, अंगात धमक होती, परिवाराची चिंता करण्याचं गणित नव्हतं. आज अंगावर परदेशी कपडे घालून मिरवताना त्यांनी पुण्यात केलेली गाजलेली होळी आठवते. दैनंदिन जगण्यात बर्‍याच जाणिवा बोथट झाल्या आहेत. काळाच्या प्रवाहात आपण स्वत:ला अनेक कारणे देऊन सामावून घेतो, ते तसं झालंय खरं, पण टिळकांची छबी आजही मनात अनेक प्रश्न विचारायला उभी असते.
      
               त्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आजचं धांगडधिंग्याचं, कमर्शियल झालेलं ओंगळ रूप पाहिल्यावर, त्यांचा मूळ उद्देश मातीला मिळवणारे आमच्यातलेच तरूण तरुणी पाहिल्यावर, वाढते गुन्हे, स्वतःची तुंबी भरता यावी म्हणून जन्माला येणारं सरकार पाहिल्यावर आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्याची कीव येते.
                    अनेक क्रांतिकारक धारातिर्थी पडल्यावर आम्हाला मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचं मोल आम्ही किती जाणतो, ह्याचं सिंहालोकन तरी आपण आपल्या मनाशी करावं, अशी जाणिव करुन देणार्‍या मनातल्या टिळकांच्या छबीला पुन्हा एकदा अभिवादन...


-बागेश्री

Post a Comment

3 Comments