ओळख

एखाद्या जुन्या गल्लीत
आपण शिरावं
आणि शोधत राहाव्यात
आठवणींच्या पुसट खुणा
जाणवत रहावं
काळाच्या ओघात
खूप काही पुसलं गेलंय
चेहरेही, खुणाही
बसकी घरे दुमजली झाली
जुनी दुमजली
नव्या रंगात न्हाली
पाण्याचा नळ नाहीसा
नाही जुना कुठलाच कानोसा
आपण बारकाईने
घेत राहतो मागमूस
ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत
आणि निराशेने माघारी वळताना
दिसतात म्हातारे चाचा
ओळखीची खूण पटते
पुढे जाऊन बोलावं का पेक्षा
'आपल्याला ओळखलं नाही तर?'
विचार मोठा होतो
आपण त्यांना ओलांडून पुढे जातो
'सुन बेटी, तुम सुल्तानाकी दोस्त थी ना?"
आपण नकळत पाया पडतो
आणि आठवणी गप्पाचा
फड तिथेच रंगतो
तळातलं सारं पुन्हा वर येतं
मनासवे तरंगू लागतं
पुन्हा आशीर्वाद घेऊन आपण
बाहेर पडतो
आता निराशा नसते
मनावर जुन्या ओळखीचा तवंग असतो...

अशी जुनी माणसं
मनाच्याही गल्लीबोळांत जपावीत
आपलीच आपल्याला ओळख पटत नाही
तेव्हा हीच मेळ घालून देतात

-बागेश्री

Post a Comment

0 Comments