वैराग्य

बघावं अस्तित्वाचं उध्वस्त खिंडार 
स्वतःबाहेर पडून..
काही भग्न अवशेष देखणे वाटून घ्यावेत फोटो
पाहावेत झूम करून कुतूहलाने..
भग्नताही लोभस असते

यावं फिरून 
बाहेरच्या मोडक्या पायर्‍यांनी
खालपासून वरपर्यंत
झालेली नासधूस घ्यावी टिपून
डागडुजी करण्याचं मात्र मनातही येऊ नये..
खिंडाराची अवस्था
सहज येत नसते

उतरून दूर व्हावं तत्परतेने
खिंडाराला सहन होत नाही
माणसांचा वावर
स्थिर आकाशाकडे पाहत
ते चिरंतन शांत उभं असतं
कुठूनही नजरेत भरतं त्याचं
सोवळं वैराग्य...

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. बागेश्री, माफ कर. संकल्पनांचा गोंधळ आहे...वैराग्य ही संकल्पना पवित्र,रम्य आणि अथांग आहे...तिला भग्नता,नासधूस,खिंडार असेल, तर अशी अवस्था नकारात्मक आयुष्याची परिणीती आहे...असं वैराग्य सोवळ,सोज्वळ,चिरंतन शांत कसे असेल?गौतमाने अतिशय सम्यकपणे सांगितले आहे की वैराग्य ही सकारात्मक विवेकाची, नुसत्या अनुभवाची नाहीतर जगण्याची एक अखंड, सनातन अवस्था आहे...ती आपण प्राप्त करून घेऊ शकतो,केवळ जाणून घेऊन,विपश्यना ह्या साधनेने स्वत:ला जाणून घेऊन...अष्टावक्र पण हेच सांगतात...केवळ परम कोटीच्या जाणीवेतून वैराग्य संपन्न अवस्था येत असते.आणि ओशो म्हणतात सावध व्हा ...परम् कोटीची सावधानता आणि त्यातून येणारी जाग ...ही वैराग्याची पहाट असते...असो.

    ReplyDelete