Wednesday, 10 August 2016

तू नसल्यावर

कैक सुरकुत्या
आकांक्षांवर
मनात
विझलेले कोलाहल
तुळशीपाशी
मिणमिण पणती
जळती विझती
तरीही तगती
तुझ्याचसाठी असेल तेवत
तुझ्या आठवणींच्या सोबत

डोळ्यात उभ्या
आयुष्याच्या
वय सरलेले
दिसेल केवळ
हिशोब सारे
संसाराचे
भासू लागतील
उगाच पोकळ
साय दाटली
एकांताची
गूज मनीचे बसेल सांगत
तुझ्या आठवणींच्या सोबत

सुन्न घराचा
एकल वासा
तुझ्याच चेह-याच्या
भासाचा
तुझीच वचने
तुझाच जागर
उरेल व्यापून
तेव्हा घरभर
छातीमधली
अनाम घरघर
फक्त एकटी असेल जागत
तुझ्या आठवणींच्या सोबत
                   -बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...