Saturday, 20 August 2016

गाभारा

पडल्याजागीच चाचपडून पाहावं
एखाद्याचं अस्तित्व
आपल्या आठवणीच्या गाभा-यात
आणि हात पोकळीत नुसताच फिरत रहावा..
कणभरही जाणवू नये
ओळखीचा स्पर्श,
कळावं
हा गाभारा आता केवळ
श्रांत, थंड... पोकळ उरलाय
तेव्हा समजून घ्यावं
तुम्ही शांततेचा किनारा गाठलाय
किनार्‍याशी गाभारा
निश्चल उभा आहे...

तेव्हा
तेववून टाकावा
एखादा नंदादीप त्या गाभा-यात
आणि मऊ उजेड मिणमिणू द्यावा 
कोण जाणो
वादळात सापडून
वाट चुकलेल्या
कोणाला
निदान किना-याची
दिशा तरी गवसेल

-बागेश्री

2 comments:

  1. अगदी मोजक्या शब्दांत.... वेदांत सुत्रांसारखी ही तुझी प्रतिभा-संपन्नता आहे.वर्तमानच ओझं होत म्हणतात; हेच ते कोडगेपण....पण मग तो 'श्रांत, थंड, पोकळ'गाभारा कुठे स्थिरावला आहे? ब्रम्हांडाच्या अवकाशात नव्हे काय? बागेश्री, ही अध्यात्म यात्रा किती सहज स्पर्शी तू केली आहेस!ह्या वयात इतकी सखोल उतरते आहेस...धन्य आहेस.

    ReplyDelete