Monday, 12 September 2016

मीच माझी पालक

माझ्या हाती मी लागले आणि मग संस्कार घडवायचे ठरलं. ठरलं की मीच माझं मुल होईन आणि पालकही. मग स्वतःला बरीच पुस्तकं भेट दिली, चांगली गाणी ऐकवली. म्युजीकने मन रमतं म्हटल्यावर गाडीत ऐकायला अशा सीडी दिल्या ज्याने प्रवासातला वेळ सत्कारणी लागेल. विविध लेखकांची पुस्तकं ह्यासाठी की आतली समृद्धी वाढत राहावी. माझे हट्ट लक्षात आले, खट्याळपणाही. नमतं घेण्याची वृत्ती दिसली आणि कुठे वरचढपणाही. ते सगळं सांभाळत आकार देणं सुरु झालं आणि लक्षात आलं ही एक नेव्हर इंडिग प्रोसेस आहे. स्वतःची स्वत:ने उचललेली जबाबदारी आहे. एखादी चूक आणि स्वतःचं नुकसान. असं थेट गणित त्यामुळे फार जपून सारासार विचार करत करावं लागतं सगळं.
        सध्या ज्यांच्या लेखी तिचं महत्व शून्य आहे अशा लोकांसोबत जुळवून घेण्याचा तिचा संयम संपत चालला आहे, अशी लोकं समोर आली की ती करवादते, तिचा मी जुळवून आणलेला साधनेचा सारा डोलारा डगमगतो. अशावेळी शिताफीने मी तिच्यासमोर चित्रकलेची वही किंवा लॅपटॉप धरते, काहीतरी नवं घडवण्यात ती मग्न होते. अशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जी चांगल्या कामासाठी वापरणं चाललंय. सध्या विजय तेंडुलकर अभ्यासते आहे. सातत्याने तिला खाद्य पुरवत राहणं, समृद्ध करत राहणं हे व्रत आहे आणि मी व्रतस्थ आहे.

बाकी, माझं बोट पकडून डौलात निघाली की आनंद वाटतो, हे खरं

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...