गाय वासरू

रानोमाळ निघून गेलेले शब्द
घुंगुरवाळा वाजवत
परतून आले की
चुकलेली गाय
वासराच्या मायेपोटी
गोठा धुंडाळत
वास्तव्याला आलीय
असं वाटू लागतं
जणू
तिचा अर्थ
इथेच टाकून
तिला
रमताच आलं नसावं
संधी असूनही
सुटता आलं नसावं
भुकेलं वासरू
थानाला लागताच
ममत्व झरू लागतं
तेव्हा पटतं खरं
काही पाश
कधीतरी जड होतात
पण तुटत मात्र नसतात

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. शब्दकळा जेव्हा प्रसन्न होतात, तेव्हा त्यांना सुंदर घुमारे फुटतात....शब्द हरवले तरी कवी-कवयित्रीच्या, साहित्यिकाच्या,कलाकाराच्या प्रेमळ पाशातून मुक्त होत नाहीत. भाव-भावना हे अस्फुट,अज्ञाताचे आणि अव्यक्ताचे झरे असतात...मनात स्त्रवत असतात....त्या असतात, सृजनशील पाऊल वाटा....प्रकाश वाटांचे शोध घेणा-या, "गोठा धुंडाळत, वास्तव्याला..." येणा-या गाई सारख्या माय भवानी....आणि "भुकेलं वासरू, थानाला लागताच...." स्त्रवू लागतात स्फुट धारा...शब्दांचे रूप लेवून.

    ReplyDelete