Tuesday, 11 October 2016

इंद्रधनू

घडी करून
नीट दुमडून ठेवलाय मी
आठवणींचा रंगीत पंखा..
घरी कुणी नसताना
मन निवांत असताना
अलवार हाती
बाहेर काढते
एक एक पातं उमलत
तो उघडत जातो
आणि घरभर
इंद्रधनुष्य पसरतं...

घराच्या तावदानातून
बाहेर झळाळू पाहतं
एक रंगीत गुपित
तेव्हा अधिकच सावध होत
मी मिटून घेते त्याला
आणि बघता बघता
इंद्रधनू गुडूप होतं...

त्याने क्षणभरात
विखुरलेले रंग मात्र
अनेक दिवस घरात
इथे- तिथे चमकत राहतात...

-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...