Monday, 3 October 2016

पावसासोबत पाऊस होऊन जावं

असा रुंजूमुंजू पाऊस पडू लागला
की वाटतं
पाठीवरलं जबाबदारीचं
ओझं उतरवून
डोंगर कपा-यातून
झिम्माड फिरून यावं..
पावसासोबत पाऊस, पाऊस होऊन जावं.
झिमझिमत राहावं अखंड
डोंगर द-यातून
घुमत राहावं जंगलाच्या
सांदीपांदीमधून
नदीपात्रातून परसादारच्या विहिरीत झिरपुन यावं
पावसासोबत पाऊस, पाऊस होऊन जावं.
घराच्या छपरावर अल्लद
अल्लद धरावा नाद
उडून गेल्या पाखराची
होऊन हळवी साद
उंब-यात आईच्या हलकेच उभं राहावं
पावसासोबत पाऊस, पाऊस होऊन जावं
रुसल्या तिच्या डोळ्यात
मारून हिरवी फुंकर
फुलवावीत स्वप्ने पुन्हा
नाजूक बावरी कातर
साजनवेड्या सखीचा, सखा होत बरसावं
पावसासोबत पाऊस, पाऊस होऊन जावं
-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...