शेवट

लिहिताना अर्ध्या राहून गेलेल्या सगळ्या कथा त्याने उघडल्या. एका नव्या फाईलमध्ये एकाखाली एक पेस्ट करत गेला. ह्या सगळ्यांना सुरुवात होती, मध्यही होता, काहींना क्लायमॅक्सही पण शेवट कुणालाच नाहीत.. आता तो ते सर्व सलग वाचत जातोय. कथांना बंदिस्त चौकट नसल्याने कुठेच सुसंगती लागत नाहीय. फक्त पात्रे. बोलकी पात्रे. ती पाहता पाहता आपापल्या जागा सोडून मोकाट फिरू लागली. एका कथेतून निघून दुसऱ्यात शिरत चालली. प्रत्येकाची काही मागणी, स्टँड आहे. इच्छा आणि महत्वाकांक्षा आहेत. कुणी फक्त गोष्टीला पुढे नेण्यापूरती साकारलेली आहेत. कुणाच्याही गोष्टीला कुणीही ढवळून काढतंय. एकाच्या गोष्टीत दुसऱ्याला जागा दिलेली नसल्याने सगळ्यांचाच एकत्रित गोंधळ उडालाय.
प्रत्येक पात्राला त्याचा स्वभाव आखून दिल्याने हा गोंधळ चौपटीने वाढलाय. अनाहूतपणे भलत्याचीच एंट्री झाल्याने आधीचं पात्र गडबडतंय. ज्याने भलत्या जागी एंट्री घेतलीय त्याला तो तिथे का आहे, हे समजेनासं झालंय. सारे एकमेकांकडे स्तब्ध होऊन बघातायत किंवा दिलेले संवाद बोलतायत. संवादाचे अर्थ हरवलेत. परफेक्ट वाटणारी पात्रं वेडसर वाटू लागलीयत. ह्याचा संवाद त्याला कळेना, कारण ह्याची कथा त्याला ठावे ना. पात्रा पात्रांची अनोखी भेट, अनोखे कन्फ्युजन. त्यांना एकमेकांशी जुळवून घेता येईना, एकमेकांशी भांडताही येईना.. सगळ्यांना रस्ता चुकल्याचं कळतंय, सगळे एकमेकांना मदत करू पाहताय, पण प्रत्येकजणच चुकल्याने मार्गदर्शनही चुकू लागलंय....
चुकत भटकत लेखकाच्या दाराशी मात्र आता ही पात्र हळू हळू जमू लागलीयत, शेवटहीन पात्रे जाब विचारायला सज्ज झालीयत आणि लेखकाला घाम फुटू लागलाय. त्याने घाबरून प्रत्येक कथा वेगळी करत पुन्हा सेपरेट फाईलमध्ये सेव्ह करायला सुरुवात केली तशी, बाहेर जमलेली एक एक पात्र तिथून नाहीशी होऊ लागली, पाहता पाहता बाहेर कुणीच उरलं नाही.....

...  साऱ्या अर्धवट उरलेल्या कथांना शेवट देण्याचा निश्चय त्याने झोपेतच करून टाकलाय!

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. खर खुर जीवन नव्हे पण जगण असचं अर्थ हीन,संकल्प रहीत,असंवेदनशील,भरकटवून टाकणारे असत....त्याला जीवन करायचं असेल, तर त्याला दिशा पाहिजे,सुसंगत अर्थ प्रवाह असला पाहिजे....ही प्राथमिक गरज..मग येतात अनेक साहित्यिक,समीक्षात्मक कसोट्या...पण बागेश्री,तू जगण्याच्या अनेक कथा असतात,म्हणतेस हे अत्यंत खरखुर वास्तव आहे....आपण सुशिक्षित,सुसंस्कृत आणि विचारवंत असल्यामुळे ह्या जगण्याला...ह्या जगण्याच्या कथांना सुव्यवस्थेत बांधण्याचा प्रयत्न करीत असतो.त्यामुळेच आपलं जगण हे जीवन होत असतं....
    तुझे हे विचार खरच जगण्याच्या आणि जीवनाच्या अर्थ गर्भाला स्पर्श करून त्यांना शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करणारे आहेत.
    तुझ्या वयाच्या आवाक्यात सहजपणे न येऊ शकणारी समज...तुला आत्ताच इतकी सखोलपणे जाणवू लागली आहे....ह्याचे मला नुसते कौतुक नाहीयेय...कारण तू ह्या पलीकडे तुझी झेप असणार आहे....खूप खूप समाधान दिलंस तू आज सकाळी सकाळी....अशीच सामर्थ्यवान होत रहा....

    ReplyDelete