Wednesday, 4 January 2017

लिटमस पेपर

लिटमस पेपर

          एखाद्याचं आपल्यावर जीवापाड प्रेम असतं आणि हेच कारण त्याला केव्हातरी आपल्यासोबत खोटं बोलायला भाग पाडतं. 'आपण दुखावले जाऊ नये म्हणून' बोललेलं ते खोटं . थोडक्यात काय तर मॅन्युपलेशन. आपणही आपल्या माणसाला पुरता ओळखत असतो. त्याच्या आवाजातल्या चढ- उतारातून, देहबोलीतून आपण जे ओळखायचय ते ओळखतोच. जिथे जवळच्या लोकांची ही कथा तिथे जागोजागी भेटत जाणारे असंख्य लोक हवं ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेन्यूपलेट करत असतातच. मानवी स्वभावातली ही फार मोठी गम्मत आहे. मुख्य म्हणजे असे करणारा त्या क्षणाला आपण सराईत, ह्या फार मोठ्या भ्रमाखाली असतो आणि समोरच्यांकडे लिटमस पेपर टेस्ट असू शकते ह्याच भान मात्र त्याला/ तिला राहात नाहीच.
               
 त्या महान क्षणी त्याचे ओशाळललेले वा गिल्टी डोळे आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर वाचू लागतो आणि समोरच्याच्या नकळत त्याची लिटमस टेस्ट घेतली जाते.
              आपण शांत चित्ताने त्याचं सारं ऐकून घेतो, त्याला न्याहाळतो, त्याची केविलवाणी धडपड पाहत राहतो. आपल्याला सारे पटले आहे पाहता समोरचा थांबतो, स्वतःच्या यशावर आनंदी होतो..
          आपणही शांतपणे स्वतःशीच हसतो आणि रंग बदललेला लिटमस पेपर मुठीतच चुरगाळून आपल्या कामाकारता रवाना होतो...  

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...