प्रवाह

आयुष्याच्या काठाकाठाने
वाहत जेव्हा जेव्हा माझा
प्रवाह तुझ्याशी येऊन थांबला आहे, कान्हा
तेव्हा तेव्हा
तुझ्या डोळ्यांत मी पहिलं आहे
अमर्याद कारुण्य
अपरंपार वात्सल्य
...तू हात देऊन मला
काठाशी बसतं केलं आहेस
आणि बांधले आहेस मोकळे केस
तुझ्या लोण्यासमान मऊसूत हातांनी
पिळला आहेस पदर
आणि निपटून काढलंस
पैंजणावरचं पाणी
मी देखील भावविभोर होत
अनुभवला आहे सारा सोहळा, कान्हा..
तुझ्या सहवासाचं आकाश
आर्त साद घालतं
आणि तूच नाही का
आणत घडवून हा विलक्षण सोहळा?
मला उन्हाशी बसवून
तू काठाशी पाय सोडून
आत्ममग्न वेणूचे सूर छेडतोस
तेव्हा मी आयुष्याच्या प्रवाहाशी
पुन्हा जुळवून घ्यावं
हेच नाही का सांगत वारंवार

तुझी अबोल भाषा प्रमाण मानून मी
तुझा निरोप घेत आले आहे सख्या
पुन्हा प्रवाही होताना
वेणूचे स्वर माझ्या डोळ्यातून
प्रवाहात एकरूप झालेले न तुला कळतात, न मला...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments