Saturday, 15 April 2017

जलाशय

एखाद्या शांत जलाशयाशी
त्याच्याच पाण्यावर पोसत
उभं असतं
एखादं झाड.. समाधीस्थ
वर्षानुवर्षे...
ते नसतं फार भरदार किंवा
दुबळंही !
अनेक ऋतू पार होतात आणि
झाड बहरतं, दाट हिरवं होतं
जलाशयही कधी तुडूंब, कधी गरजेपुरतं

यथावकाश
झाडावर येते सोनेरी छटा
आणि
गळून जाणाऱ्या पानांनी
जलाशयावर उमटत राहते
अबोल थरथर
हळू हळू निष्काचंन होत जातं.. ते झाड

ते झाड, ते जलाशय
वर्षानुवर्ष
एकमेकांना सोबत करतात
विनाशर्त सोबत
अखंड तरीही अलिप्त,
सोबत!

काही संसार असेच असतात...

-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...