Wednesday, 14 June 2017

सरोवर

स्वतःच्या अस्तित्वाच्या
सरोवरात डुंबत रहावं तास न् तास
नि कधीतरी बाहेर पडावं
अनुभूतीची ओल
गच्च अंगावर घेऊन...
बसून रहावं शांत
वास्तवाचा करकरीत सूर्य
अंगावर घेत,
निथळू द्यावा
थेंब न् थेंब
स्तब्ध परिसरात..

काही वेळाने
पहावं वाकून
स्वतःचंच रूप
स्वतःच्या सरोवरात..
दोन डोळ्यांची
लख्ख तकाकी
निरखत राहील
एक नितळ तळ!

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...