Sunday, 25 June 2017

माती

तुला माती होता येईल का?
मी जिरूनच जाणार आहे
एके दिवशी
माझी सगळी सुख दुःखे,
मान अपमान
त्रास आनंद
स्वाभिमान
अहंकार
सगळं घेऊन
मातीत घट्ट जुळून येणार आहे..
त्याआधीच,
तुला माती होता येईल का?
तू फक्त मुसळधार बरसून जातोस,
मीही फक्त नखशिखांत भिजत राहते
तुझ्याशिवाय देहावरून काहीच वाहून जात नाही..
तू माझ्या डोळ्यासमोर जिरून जातोस,
ती माती आपली नाही!
तू माझी माती हो
तसंही, किती युगे ह्या चक्रात अडकायचंय?
मला तुला भेटायचंय!

-बागेश्री

1 comment:

  1. हे माती आणि मी-माझी सुख-दु:खे,...सर्वच माझेपण...ह्यातील हे द्वंद्व आहे का? मेघ जलस्त्रोत्र आहे....तो निसर्गाचा अवतार आहे, निसर्गाचे रूप आहे, पंचमहाभूतांतील अवतरण आहे...त्याला बागेश्री म्हणते "माती हो, असं का सांगते आहे? तिचे मी-पणातील माझेपण हिरावून घेण्यासाठी की सामावून घेण्यासाठी...हे माझेपण संपले की हे द्वंद्व समाप्त होणार आहे. कारण मग फक्त मी उरतो...हा मी म्हणजेच माणसाच्या एकांतात भेटणारा परमात्मा आहे...."तुला माती होता येईल का?" मेघ,पाऊस आणि माती....ह्या तिन्ही निसर्ग रूपांना अद्वैत रुपात पाहण्यासाठी तुका जसा व्याकूळ झाला, तशी ही बागेश्रीची अभिव्यक्ती चिंब भिजवून टाकते. मेघ= सत्वगुण, पाऊस= रजोगुण आणि माती=तमोगुण...ह्या तिन्हींचा समुच्चय एक होतो, त्याला मानवी धर्म म्हणतात...आणि ह्या त्रिगुणांचा निर्गुण होतो, तेव्हा परब्रम्ह अवतरते....

    ReplyDelete