शपथभूल

चांदण्यांची शपथभूल 
मोडता यायला हवी..
राहत्या वस्तीतून 
उठता यायला हवं..
आकाशाची स्वप्नं उशाशी 
जगणं फुलण्याची आस निरंतर
आशेची माती
भेगाळता,
रेंगाळणं टाळता यायला हवं..
आपल्यापूरतं आपलं गाव
वसवता यायला हवं!

नसो भांडवल गाठी
नसो कुणीही साथी
डोळे धुवून वास्तवाने
भविष्य घ्यावे हाती..
आपल्यापरीने नाव आपलं
कमावता यायला हवं...
अंधारातून उजेडाकडे
नकारातून होकाराकडे
जीवाच्या या पाखराला
उडता यायला हवं
आपल्याकरता आपलं आकाश
व्यापता यायला हवं...

राहत्या वस्तीतून एकदाच
उठता यायला हवं,
आपल्यापूरतंं आपलं गाव
वसवता यायला हवं...!!

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. " डोळे धुवून वास्तवाने...भविष्य घ्यावे हाती.." परंपरेची पाऊलवाट सोडावी. स्वत:च्या स्वतंत्र प्रतिभेचा,जगण्याचा नव्हे तर जीवन यात्रेचा आणि स्वत्वाचा शोध घ्यायचा आहे तर बागेश्रीची ही श्रद्धा आहे आणि जीवन धारणा आहे की "आपल्यापूरतंं आपलं गाव,वसवता यायला हवं...!!".ह्या कवयित्रीचे वास्तवाचे भान केवळ स्वत:पुरते नाहीयेय...ती म्हणते "गाव वसवता आल पाहिजे".माझा शोध हा फक्त माझ्यापुरता आहेच, पण त्यापलीकडे माझं स्वप्न आहे....गाव वसवता आल पाहिजे, कारण मी समाज पुरुष आहे, पुरुषसुक्त ही माझी मानवतेची अभिव्यक्ती आहे....बागेश्री, तुझं हे आकाश तुला व्यापण्यासाठी प्रार्थना शक्ती मिळो आणि तू दिग्विजयी भव....

    ReplyDelete
  2. 👍 mast .. Khup sundar meaningful

    ReplyDelete