उंदीरायण

आमच्या घरात एक उंदीर शिरला. तो फारच Happy- Go- Lucky स्वभावाचा होता. आनंदाने चूं चूं असे गाणे गात तो घरभर हिंडायचा. खेळायचा. खाऊन पिऊन सुखी रहायचा. लपाछपी हा त्याचा अत्यंत आवडीचा खेळ. त्याच्या दृष्टीला बहुधा प्रकाशाचा त्रास होता. दिवसापेक्षा रात्री तो अधिक चपळ वावरू शकायचा. आधी तो फार धीट नव्हता. पण आमच्या घरातली माणसं कनवाळू आहेत हे त्यालाही पटले आणि तो आम्हाला वॉशिंग मशिनच्या खालून ते सोफ्याच्या सांधीत असे धावून दाखवू लागला. तो बहूधा अटेंशन सीकर सुद्धा असावा. कारण "अले, लब्वॉड किती चान पलतो ले" असे आम्ही कुणीच कौतुक न केल्याचा राग, तो सोफा इत्यादि कुरतडून व्यक्त करायचा. राग आला की कुरतडावे असे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य होते.

                   त्याला टिव्हीवर कौटुंबिक चित्रपट पहायला फार आवडायचे. आम्ही दर रविवारी सिनेमा पहात असता, लाईट बंद होताच, तोही सोफ्याआडून टिव्ही पहायचा. सहसा जुने चित्रपट, त्यातून अधे मधे भरमसाठ जाहिराती. तीन तासांच्या वर सिनेमा चाले. भूक लागणे साहाजिकच .. 
तेव्हा हा आमच्या कुणाच्याही पायात न येता. आम्हाला जराही त्रास न देता किचन मध्ये जायचा. लहान- सहान गोष्टींचे त्याला मुळातच फार कुतूहल असल्याने  "ओट्यावर काय बरे झाकून ठेवलेय" म्हणत झाकण्या सरकायच्या. आता त्यात थोडीफार खुडबुड होणारच. पण आमच्या साबा (सासूबाई) पडल्या जुन्या काळातल्या! त्यांना खुडबूड सहन व्ह्यायची नाही. त्या किचनमध्ये जाऊन भस्सक्कन लाईट लावायच्या. त्याला होता प्रकाशाचा त्रास! तो भर्र्कन अंधा-या खाऊच्या ट्रॉलीत शिरायचा. त्यात साबा त्याला रागाच्या भरात बरेच उणेदुणे बोलित. तोही रागाच्या भरात चिवड्याची बॅग कुरतडे, त्वेशाने बिस्किटेही फोडी. अशात-हेने शीघ्रकोपी साबा आणि शीघ्रकोपी तो एकही चित्रपट संपूर्ण पहात नसत. 

             .... एकेदिवशी दुपारी, आम्ही नेहमीप्रमाणेच त्याचे "अले, लब्वॉड..." कौतुक न केल्याने, त्याने चक्क साबुंची महत्त्वाची फाईल कुरतडली. आता इतका गुणी उंदिर, जरातरी शिकला सवरला असेल असा माझा समज होता. पण म्हणतात ना रागावर नियंत्रण नसले की आपण आपलेच नुकसान करून घेतो. साबु रागाच्या भरात बाहेर गेले. येताना वड्या आणल्या. आणि त्याच्या आवडीच्या जागी ठेवल्या. 

                    "शनिवार नंतर रविवार " या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे बरोब्बर दुसरे दिवशी रविवारची सकाळ होती. उशिरा उठणे, घर आवरणे या व्यापात
 दिवसभर काही लक्षात आले नाही पण संध्याकाळी सिनेमा पाहताना, स्वयंपाकघरात काहीच खुडबूड झाली नाही! साबा- साबुंनी  शांतपणे चित्रपट संपूर्ण वगैरे पाहिला. कुठे खुसफूस नाही की पळून दाखवणे नाही. सोमवार सकाळीही कुठेच महाशयांच्या खाणाखुणा नाहीत. न कुठल्या कोप-यातून चूं चूं ची गुणगुण आली. माझ्या हातची करपली पोळी आणि खारट भाजीच त्याला प्रिय असावी. वड्यांची चव न आवडून रागाच्या भरात तो कुठेतरी निघून गेला असा मी निष्कर्ष काढावा हे मात्र नियतीला मान्य नसावे.
                          
                       ऑफिसमध्ये गेल्या गेल्या काही उत्तम रटाळवाण्या मिटिंग संपवून जागेवर आले.  जागेवरच चहा मागवला. आणि बिस्किटे काढण्यासाठी सॅक मध्ये हात घातला तो फोडलेली बिस्किटे! आणि मागोमाग टुण्ण्कन उडी मारत महाशय बाहेर आले. मी त्याच्या चांगल्याच ओळखीची असले तरी बहुधा चहा घेऊन आलेला पँट्रीवाला ओळखीचा नसल्याने तो त्याला 'पहा पहा, माझे अंग कित्ती लवचिक' असे दाखवत टेबल पार्टिशियनच्या बारीक फटीतून पसार झाला. पँट्रीवाल्याने "अले लब्वॉड..." न केल्याने संभाव्य धोक्याची मला कल्पना आलीच. आणि मी मात्र काहीही न पाहिल्यासारखे कंप्यूटरमध्ये डोके घालून चहाचे भुरके घेऊ लागले. पँट्रीवाला तिथून केव्हा निघून गेला, ते काही आता आठवत नाही.  

-बागेश्री
28th Oct'17

(Caricature/ Illustration by Sh. Guru Thakur) 




Post a Comment

0 Comments