आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भावाच्या लग्नाला गेले असता, काहीतरी छोटे मोठे सामान आणायची लिस्ट मामींनी हाती दिली. आम्ही बहिणी दुपारचे टम्म जेवून बाहेर पडणार इतक्यात "पिंके, बाहेर चाल्लीस की?" हाक आली. आमची आज्ज्जी आज ९२ वर्षांची असली तरी नजर, आवाज, सारे खणखणीत आहे. तिचा डोळा लागलाय असा माझा अंदाज होता. पण हाक आल्यावर दार ढकलून तिच्या खोलीत गेले. थंडीचे दिवस असल्याने रग ओढून पडली होती. तिची रूम, उबदार छान. "हो आज्जी, थोडे फार सामान आणायचेय, डिझायनर मुंडावळी पण, तुला काही आणू काय?" अगदी अपेक्षित प्रश्न विचारला गेल्याचं समाधान दाखवत, ती उठली.
मला वेसलीन ची डब्बी आणुन देतीस? - भाबडेपणे विचारत
देते की. अजून काही आणायचे आज्जी?
कोणती आणतीस?- पुढचा प्रश्न!
(आता आज्जीला पेट्रोलियम जेली लागणार अशी माझी स्पष्ट समजूत)
मला माहितेय. आणते बरोबर
(पण मला सवड न देता)
नको थांब. माझं ते कपाट उघड. हाताशी एवढी पोरं आहेत पण कुणालाही सांगितलं की उगं आपलं मेणासारखं कैतरी आणून द्यायलेत (हीच ती पेट्रोलियम जेली!). ती माझी कपाटातली बाटली ने. तश्शीच आणून दे मला.
(मी कपाट उघडेस्तोवर. इकडे लाखोली....)
ह्यांना कुणाला कळना. अर्ध लक्ष कुठे राहते की. मला तेच वेसलीन लागते. ह्यांनी स्वतःचं संपवतेत, माझं वापरतेत. पिंकी आमची मुंबैची. आणती बरोब्बर. (माझं नाक लगेच वर)

मी कपाटातली बाटली काढली. ते वॅसलिन- बॉडी व्हाईटनिंग- मॉइश्चराईजर होते. मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व आकारांपैकी सगळ्यात मोठी बाटली. तिला स्वतःला तेच लोशन हवे व घरातल्या इतरांनाही तिला पुरवठा करावा लागत असल्याने, मोठीच बाटली हवी होती.
मी म्हटले,
ही अशी पाहिजे ना तुला, आणते मी.
पण लगेच,
बाटली नेतीस की? ने उगी.  दुसरी आणू नकोस. मला हीच पाहिजे.
हो आज्जी. आले लक्षात. तुला अगदी अशीच आणून देते
त्यावर
पैसे आहेत की तुझ्याकडे? (मी तिकडे रिलायन्सला सिनिअर मॅनेजर वगैरे)
हो हो आहेत
बरं आण
तिच्या अंगावर रग टाकून, दार ओढताना
बरं पिंके
हे ने... (माझ्या हाती १०० ची नोट देत)
तुझ्यासाठी पण घे, काही टिकली पावडर वगैरे
हो आज्जे, सो स्विट! (तिच्या गळ्या पडत)
बरं, जा माय. उशीर करू नका. कार ने जा, कार ने या. जेवलीस की?
हो हो...

तिला बाय करून निघाले, येताना तिला हवे तेच मॉइश्चराईजर जम्बो पॅक आणले. यावर खुष होऊन तिले मला नाजूक झुमके गिफ्ट केले. (ती  नेहमीच काहितरी देत असते, हे असे फक्त बहाणे पुढे करते)

तिने दिलेले ते झुमके, कुठल्याही ट्रेडिशनल ड्रेसवर, साडीवर फार सुंदर दिसतात. मला कायम तिच्या सौंदर्यदृष्टीचं कौतुक वाटत आलंय. कुठल्याही गोष्टी ती अत्यंत चोखंदळपणे निवडते. तिच्याकडे, तिच्या घरात असलेल्या गोष्टी निर्विवाद सुंदर असतात. त्या निवडीचं मला अमाप नवल आहे.
         तिने आजोबांच्या मागे, त्या घराला कणखरपणे आकार दिलाय. तिच्या कुटूंबाचा पसारा फार मोठा असूनही, आज तिची मुले- नातवंड सारे फार यशस्वी लोक आहेत. ये यश सर्वस्वी तिचं आहे. म्हणूनच आजही तिच्या शब्दाबाहेर जाण्याची कुणाचीच प्राज्ञा नाही....
           तिच्या वागण्यातला "स्पेसिफिक" गोष्टी, स्वतःच्या स्टाईलमध्येच हवे असण्याचा अट्टहास, कुणाकडून काय काम करून घ्यावे या बाबतीतली तिची परखड नजर, नक्कीच या यशामागचं रहस्य आहे, असं मला वाटून गेलं.

आज मी तयार होताना तिने दिलेले झुमके घातले, तेव्हा तिची आठवण फार तीव्रतेने आली त्यात माझी मॉइश्चराईजरची बाटली फुस्सुक फुस्सूक करून संपल्याने, हा प्रसंग जशास तसा आठवला....

-बागेश्री





Post a Comment

0 Comments